नंदुरबार जिल्हा

सोनगीरपाड्यातील बालिकेच्‍या शरीराचे लचके तोडणार्‍या नराधमाला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा; १६ हजारांचा दंडही ठोठावला; नंदुरबार पोलिसांनी १३ महिन्‍यांतच मिळवून दिला न्‍याय!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : पुणे जिल्‍ह्यातील नसरापूर येथील ३.५ वर्षांच्‍या चिमुरडीचे लैंगिक अत्‍याचार व खुनाचे प्रकरण गाजत असतानाच नंदुरबार जिल्‍ह्यात घडलेल्‍या अशाच लैंगिक अत्‍याचार प्रकरणातील पीडित बालिकेला नंदुरबार पोलिसांनी अवघ्‍या १३ महिन्‍यांतच न्‍याय मिळवून दिला आहे. सोनगिरपाडा येथील अवघ्‍या सात वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्‍याचार करून तिच्‍या शरीराचे लचके तोडणार्‍या किसन उर्फ किश्‍या नामदेव गावित या ३८ वर्षीय नराधम तरुणाला (रा. बंधारपाडा (वडगाव) ता. व जि. नंदुरबार) अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाने २० वर्षांचा कारावास आणि १६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्‍याच्‍या हद्दीतील सोनगिपाडा गावात फिर्यादीच्‍या आई व भावाच्‍या घराचे बांधकाम सुरू असताना २१ मार्च २०२५ रोजी ही घटना घडली होती. फिर्यादी महिला या बांधकामाच्‍या ठिकाणी पतीसह जुन्‍या घराच्‍या विटा काढत असताना त्‍यांची ७ वर्षीय मुलगी आसपास खेळत होती. याचवेळी त्‍यांच्‍या ओळखीतीलच मिस्‍त्री काम करणार्‍या किश्‍या गावित याने या बालिकेला ‘वेफर्स घेण्‍यासाठी बाजूच्‍या दुकानात जावू या’ असे आमिष दाखवून सोनगिरपाडा धरणाकडे नेले होते. त्‍या ठिकाणी आसपास कुणीही नसल्‍याचा गैरफायदा घेत या नराधमाने तिच्‍यावर लैंगिक अत्‍याचार केले होते.
तेथून परतल्‍यावर सदर बालिकेने आईला आपबिती सांगितल्‍यावर त्‍यांनी तातडीने नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी भारतीय न्‍याय संहितेच्‍या कलम ६५ (२), १३७ (२) तसेच बालकांचे लैंगिक अत्‍याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ च्‍या कलम ४, ५ (एम) व ६ अन्‍वये किश्‍या गावित याच्‍यावर गुन्‍हा दाखल करून त्‍याला तत्‍काळ अटक केली होती.
शास्रोक्‍त तपास, जलद आरोपपत्र
नंदुरबार तालुका पोलीस ठाण्‍याचे तत्‍कालीन प्रभारी सुनील भाबड व त्‍यांच्‍या पथकाने तातडीने या गुन्‍ह्याचा शास्रोक्‍त पद्धतीने तपास करीत महत्त्‍वाचे पुरावे गोळा केले होते. तसेच जलद गतीने तपास पूर्ण करून अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयात आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते.
या खटल्‍यात सरकारी पक्षाच्‍या वतीने महत्त्‍वाचे साक्षीदार तपासण्‍यात आले. यात पीडित बालिका, तिचे पालक, वैद्यकीय अधिकारी, पंच व तपास अधिकारी यांच्‍या साक्षी महत्त्‍वाच्‍या ठरल्‍या. या खटल्‍याची सुनावणीही जलद गतीने झाली आणि अखेर आरोपीवर गुन्‍हा सिद्ध झाल्‍याने अतिरिक्‍त जिल्‍हा व सत्र न्‍यायालयाने आरोपी किसन उर्फ किश्‍या गावित याला २० वर्षांचा सश्रम कारावास आणि १६ हजार रुपयांच्‍या दंडाची शिक्षा सुनावली.
दरम्‍यान, अत्‍याचार पीडित बालिकेला अवघ्‍या १३ महिन्‍यांत न्‍याय मिळवून दिल्‍याबद्दल नंदुरबार पोलिसांचे कौतुक होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button