शहाद्याच्या तोरखेड्यात जबर घरफोडी : मागचा दरवाजा तोडून घरातून अडीच लाखांचा ऐवज लांबवला; सोने- चांदीसह रोख रकमेवर डल्ला

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, सतत चोरीच्या घटना घडत असल्याने जिल्हाभर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. जिल्हाभरात अनेक मंदिरांमध्ये डल्ला मारल्यानंतर आता चोरट्यांनी शहादा तालुक्यातील तोरखेडा गावात बंद घर फोडून तब्बल अडीच लाखांचा ऐवज लाबंविल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये सोने-चांदीचे दागिणे आणि रोख रकमेचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोरखेडा गावातील शेतकरी शिवदास प्रल्हाद गिरणारे यांच्या घरात ही चोरी झाली. गिरणारे यांचे घर बंद असताना ३ मे रोजी रात्री ११ वाजेनंतर अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा मागील दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. यानंतर घरातील दोन लोखंडी कपाटात ठेवलेल्या सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन पोबारा केला.
चोरीला गेलेल्यात मंगळसूत्र, अंगठ्या, कानातील बाळ्या, लहान मुलांच्या कानातील कड्या पायातील जुडवे आणि पैंजण तसेच ७० हजार रुपये रोख अशा एकूण २ लाख ४९ हजार रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. सोमवारी (दि. ४) सकाळी गिरणारे यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी सारंगखेडा पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद नोंदवली. पोलिसांनी चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप हे चोरटे हाती लागलेले नाहीत.
चोरटे मध्यप्रदेशातील ?
शहादा, सारंगखेडा तसेच नवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने चोरीच्या घटना उघडकीस येत असून, गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी विशेषत: मंदिरांना टार्गेट केल्याचे दिसून आले. महत्त्वाचे म्हणजे शहादा व सारंगखेडा येथून मध्यप्रदेशची हद्द जवळ असून, आतापर्यंत या परिसरात झालेल्या बहुतांश चोरीच्या घटनांत चोरटे मध्यप्रदेशातील असल्याचे निष्पन्न झाले आहे. आताही तोरखेडा येथील चोरीच्या घटनेतील चोरटे महाराष्ट्राला लागून असलेल्या मध्यप्रदेशच्या सीमावर्ती भागातील असल्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, तोरखेडा येथील चोरीच्या घटनेचा तपास सारंगखेडाचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल करीत आहेत.



