राजकीय वादातून उफाळली भाऊबंदकी; शहाद्याच्या जावेद तर्फे बोरदमध्ये सात जणांकडून दोन भावांना मारहाण; दोघेही जबर जखमी
शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : चार वर्षांपूर्वी उपसरपंचपदाच्या निवडणुकीत उमेदवार उभा केल्याच्या रागातून सात जणांनी भावकीतीलच दोन भावांना जोरदार मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील जावेद तर्फे बोरद गावात सोमवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी सर्व सात जणांविरोधात म्हसावद पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवून मारहाण करीत दोघांना जखमी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२२ मध्ये गावात पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत दीपक नवलसिंग गिरासे यांनी कोमलसिंग गिरासे यांना उपसरपंच पदासाठी रिंगणात उतरवले होते. तेव्हापासून विरोधी गटातील गिरासे मंडळी यांच्या मनात दीपक गिरासे यांच्याविरोधात राग धगधगत होता. राच रागातून सात जणांच्या जमावाने सोमवारी (दि. ४) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास बेकायदेशीरपणे एकत्र येत दीपक व त्यांचा भाऊ शामसिंग नवलसिंग गिरासे या दोघांवर हल्लाबोल केला. या सर्वांनी सकाळी दीपक गिरासे यांच्या घरासमोरील अंगणात येत त्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच हातातील हत्याराने मारहाण करीत जबर जखमी केले. यावेळी मध्ये आलेल्या शामसिंग यावालाही या टोळक्याने मारहाण केली. या मारहाणीत दीपक व शामसिंग जखमी झाले.
रात्री उशीरा दीपक गिरासे यांनी म्हसावद पोलीस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल केली. त्यावरून ऋषिकेश भगवान गिरासे, गणेश लखेसिंग गिरासे, निर्भय गणेश गिरासे करण लखेसिंग गिरासे, तेजस सुनील गिरासे, रणजितसिंग विजेसिंग गिरासे, दीपक रणजितसिंग गिरासे या सात जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलीस हवालदार रवींद्र ठाकरे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



