तळोद्यात खून : दारूच्या नशेत बापाने घेतला तरुण मुलाचा बळी; रोझवा प्लॉटमधील धक्कादायक घटना
तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दारू पिवून आल्यानंतर जाब विचारणार्या मुलाचा बापानेच खून केल्याची धक्कादायक घटना तळोदा येथील रोझवा प्लॉटमध्ये घडली. किरण अरविंद पदम नाईक (१८) असे या घटनेत प्राण गमावलेल्या तरुणाचे नाव असून, त्याचा खून करणारा बाप सध्या कोठडीची हवा खात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद पदम नाईक (४०, रा. रोझवा प्लॉट, ता. तळोदा, जि. नंदुरबार) हा ३ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत झोकांड्या खात घरी पोहोचला होता. यावेळी त्याचा मुलगा किरण याने यावर आक्षेप घेतला. यामुळे अरविंद व किरण यांच्यात अरविंदच्या नेहमीच्या दारू पिण्याच्या सवयीवरून वाद झाला. यामुळे अरविंद याचा राग अनावर झाला आणि दारूच्या नशेतच तो किरणच्या अंगावर धावून गेला. तो वार चुकवताच चवताळेल्या अरविंदने पुन्हा किरणवर धावून जात त्याला पकडून ढकलून दिले. यामुळे किरण हलक्या अंगाने जमिनीवर आदळला आणि बेशुद्ध होवून काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तळोदा पोलिसांनी घटनास्थळ गाठून अरविंद पदम नाईक याला ताब्यात घेतले. मुलाचे मामा विनोद अंबरसिंग पाडवी यांच्या तक्रारीवरून अरविंद विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. नंतर त्याला तळोदातील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकार्यांच्या न्यायालयासमोर उभे करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सध्या पोलीस उपनिरीक्षक महेश निकम हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



