नंदुरबार जिल्हा

कुंभमेळा निधीत नाशिक तुपाशी, प्रकाशा उपाशी; आ. रघुवंशी म्‍हणाले, नाशिकच्‍या तुलनेत किमान १० टक्‍के निधीसाठी पाठपुरावा करणार; जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक 

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नाशिकप्रमाणेच दक्षिण काशी म्‍हणून ओळखल्‍या जाणार्‍या नंदुरबार जिल्‍ह्यातील प्रकाशा येथेही सिंहस्‍थ कुंभमेळा होणार असला तरी नाशिकच्‍या तुलनेत प्रकाशा येथील विकासकामांसाठी सरकार फारसा निधी देत नसल्‍याने जिल्‍हाभरात नाराजीचे चित्र आहे. नाशिकला दिल्‍या जाणार्‍या निधीच्‍या किमान दहा टक्‍के तरी निधी प्रकाशा येथील सिंहस्‍थ कुंभमेळ्‍याच्‍या तयारीच्‍या कामांना दिला जावा, यासाठी शासन स्‍तरावर प्रयत्‍न करणार असल्‍याचे आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी म्‍हटले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रकाशातील आगामी सिंहस्थ मेळाव्याच्या आयोजनाच्‍या तयारीच्‍या आढाव्‍यासाठीची बैठक आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी त्‍यांनी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ग्रामस्थ सांगतील ती विकासाची कामे प्रशासकीय पातळीवरून लवकरात लवकर करावीत. अधिकाऱ्यांनी त्यांच्या दालनात बसून विकास कामांचे नियोजन करू नये, असे अधिकार्‍यांना सुनावले.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळा निधीच्या किमान १० टक्के निधी प्रकाशा येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी मिळावा, यासाठी मी शासनाकडे प्रयत्‍न करेल. शासनाकडून अद्याप निधी प्राप्त झालेला नाही. परंतु, जिल्हा नियोजन समितीकडून पाच ते सहा कोटी निधीचे नियोजन आहे. विकास कामांच्या माध्यमातून कुंभच्या निमित्ताने प्रकाशा गावाचा कायापालट झाला पाहिजे, असेही आ. रघुवंशी यांनी सांगितले.
यांची होती उपस्‍थिती
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे, शहाद्याचे नगराध्यक्ष अभिजीत पाटील, जि.प. माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, सिंहस्थ मेळा कार्यकर्ते दुर्गेश पाटील, हरी पाटील, दिलीप पाटील, गजानन भोई, अमृत ठाकरे, पंढरीनाथ पाटील, निलेश ढोले, शरद पाटील यांच्‍यासह अन्‍य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ. सेठींचे अधिकाऱ्यांना निर्देश
आगामी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून उपाययोजना करण्यात येत आहेत. सर्व जबाबदार अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावरील कामे जलद गतीने पूर्ण करावीत, रस्ते, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधेवर अधिक भर द्यावा, प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्‍याच्‍या कामांचा वेळोवेळी आढावा अधिकाऱ्यांनी त्यांच्या स्तरावरून घ्यावा, कामे जलद गतीने होतील याकडे लक्ष द्यावे, असे निर्देश यावेळी जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी आपल्‍या प्रशासनातील अधिकार्‍यांना दिले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button