खाटूश्याम, अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणार्यांसाठी गोड बातमी; काकीनाडा-हिस्सार गाडी आता नंदुरबारहून नियमित धावणार

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : काकीनाडा ते हिस्सार या दोन स्थानकांदरम्यान धावणारी विशेष रेल्वे आता नियमित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या गाडीने राजस्थानातील खाटू श्याम आणि अजमेर दर्गा येथे थेट जाता येत असल्याने या ठिकाणी दर्शनासाठी जाणार्या भक्तांची मोठी सोय झाली आहे.
खानदेशातून खाटूश्याम आणि अजमेर दर्गा येथे दर्शनासाठी जाणार्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र, या दोन्ही ठिकाणी जाण्यासाठी आधी भक्तांना अनेक ठिकाणी बस किंवा रेल्वे बदलावी लागत असे. या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने काकीनाडा ते हिस्सार या दोन स्थानकांदरम्यान विशेष रेल्वे सुरू केली होती. या अपडाऊन गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता रेल्वे प्रशासनाने या गाड्या नव्या क्रमांकासह नियमित करण्याचा निर्णय घेतला आहे.
या अंतर्गत १७२९५ या नव्या क्रमांकासह काकीनाडा ते हिस्सार ही साप्ताहिक गाडी आता १२ मेपासून नियमित धावेल. ही गाडी दर मंगळवारी पहाटे ५.४० वाजता काकीनाडा टाऊन येथून सुटून तिसर्या दिवशी हिस्सार येथे १०.२० वाजता पोहोचेल. तर १७२९६ क्रमांकाची हिस्सार ते काकीनाडा एक्स्प्रेस गाडी १५ मेपासून दर शुक्रवारी हिस्सार येथून दुपारी २.१० वाजता सुटून तिसर्या दिवशी ९.०५ वाजता काकीनाडा टाऊन येथे पोहोचेल. या दोन्ही गाड्या आता नियमित स्वरूपात धावणार असल्याने नंदुरबारसह खानदेशातून खाटूश्याम बाबा व अजमेर दर्गाच्या दर्शनासाठी जाणार्या भाविकांना मोठा दिलासा मिळणार आहे.



