राजकारण

शहाद्यातील राजकारण पुन्‍हा पेटले; नगराध्‍यक्षांचा अजेंडा भाजपला अमान्‍य, अभिजित पाटील यांच्‍यावर दुर्लक्षाचा आरोप, आजच्‍या सभेवर बहिष्‍काराचा इशारा!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अवघ्‍या २० दिवसांच्‍या अंतराने शहादा नगर परिषदेची आज, बुधवारी (दि. ६) होणारी विशेष सर्वसाधारण सभा वादाच्‍या भोवर्‍यात सापडली आहे. नगराध्‍यक्ष अभिजित पाटील मनमानी करीत असल्‍याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्‍या २२ नगरसेवकांनी नगराध्‍यक्षांनी निश्‍चित केलेला सभेचा अजेंडा मान्‍य करण्‍यास नकार दिला आहे. आजच्‍या सभेवर बहिष्‍काराचा इशाराही या नगरसेवकांनी दिल्‍याने आज शहाद्यात नेमके काय होणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
शहादा नगर पालिकेत भारतीय जनता पक्ष व जनता विकास आघाडी असे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत. त्यात नगराध्यक्ष जनता विकास आघाडीचे तर बहुमत व उपनगराध्यक्षपद तसेच विविध समित्या भाजपकडे आहेत. याआधी न.प.ची १७ एप्रिलला झालेली सभा वादळी ठरली होती. या सभेत ६४ पैकी ५४ विषयांना मंजुरी देताना १० विषय नामंजूर अथवा स्थगित करण्यात आले होते. या सभेत बांधकाम सभापती संतोष वाल्हे यांनी अत्यंत आक्रमक होत नगराध्यक्षांच्या दिशेने काळीपट्टी भिरकावून संताप व्यक्त केला होता.
भाजपचे बहिष्‍कारास्र
आता काही नगरसेवकांच्‍या मागणीवरून नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी आज बुधवारी विशेष सभा बोलावली आहे. या विशेष सभेत शहराच्या विकासासंबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले जावून पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत चर्चा होण्याची शक्यता व्‍यक्‍त होत होती. मात्र, भाजपच्‍या नगरसेवकांनी अचानक बहिष्‍कारास्र उगारल्‍याने या सभेचा नूर नेमका काय राहणार, याची उत्‍सुकता शहादावासीयांना लागली आहे. आजच्‍या सभेसाठी नगरसेवकांना पाठविण्‍यात आलेल्‍या विषय पत्रिकेत शहराच्‍या विकासाचे विषयच नसल्‍याचा आरोप करीत भाजपच्‍या नगरसेवकांनी आजच्‍या सभेवर बहिष्‍कार टाकण्‍याचा इशारा दिला आहे.
याआधी उपनगराध्‍यक्षा माधवी पाटील व पक्षाचे प्रतोद ज्ञानेश्‍वर चौधरी यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील भाजपच्‍या नगरसेवकांनी जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेटही घेत नगराध्‍यक्ष अभिजित पाटील शहराच्‍या विकासाकडे दूर्लक्ष करीत असल्‍याचा आरोप केला होता. त्‍यानंतर आता आजच्‍या सभेसाठी विषय पत्रिकेवर शहराच्‍या विकासाशी संबंधित विषय घेतल्‍याचे अभिजित पाटील यांनी म्‍हटले आहे. मात्र, नगराध्‍यक्षांचा अजेंडा पसंत न पडल्‍याने भाजपने सभेवर बहिष्‍काराची भूमिका घेतली आहे. यामुळे आजच्‍या सभेचा कोरम पूर्ण होण्‍यासह विषयांच्‍या सहमतीवर अनिश्‍चिततेचे सावट पसरले आहे.
‘नंदुरबार पोस्‍ट’चे वृत्त खरे ठरले…
नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांनी नगर परिषदेची विशेष सभा बोलावल्‍यानंतर ‘नंदुरबार पोस्‍ट’ने दोन दिवसांपूर्वीच ‘गळ्‍यात गळा की पुन्‍हा पायात पाय, शहादा नगर परिषदेत होणार काय ?; १७ एप्रिलच्‍या वादळी सभेनंतर आता येत्‍या बुधवारी विशेष सभा’ या मथळ्‍याखाली वृत्त प्रसारित केले होते. त्‍यानंतर लगेच भाजपच्‍या नगरसेवकांनी या विशेष सभेवर बहिष्‍काराचा इशारा दिल्‍याची बातमी समोर आल्‍याने शहादा नगर पालिकेत अजूनही नगराध्‍यक्ष विरोधात भाजप असा सामना सुरूच असल्‍यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button