गेला अमित पालोदकर कुणीकडे? : ५० लाखांच्या ठेवींवर डल्ला मारणारा शहाद्यातील एचडीएफसीचा व्यवस्थापक पोलिसांना सापडेना; १४ दिवसांनंतरही फरारच…

शहादा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहाद्यातील एचडीएफसी बँकेत दोन ग्राहकांनी ठेवलेल्या सुमारे ५० लाख रुपयांच्या ठेवींवर डल्ला मारणारा या बँकेचा व्यवस्थापक (कस्टमर रिलेशन मॅनेजर) अमित पालोदकर व त्याचा सहकारी आरोपी आदर्श भालेराव या दोघांचा ठावठिकाणा शोधण्यात अद्याप तरी नंदुरबार पोलीस दलाला यश आलेले नाही. तब्बल १४ दिवसांनंतरही हे दोघे फरार असून, अनेक ठिकाणी शोध घेऊनही पोलिसांना त्यांचा पत्ता लागू न शकल्याने या दोघांना ‘आसमां खा गया या धरती निगल गयी’ असा प्रश्न एचडीएफसी बँकेच्या फसवणूक झालेल्या ग्राहकांना पडला आहे.
एचडीएफसी बँकेच्या शहादा शाखेचा लालची कस्टमर रिलेशन मॅनेजर अमित अनिल पालोदकर (रा. पालोद, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याने सेवानिवृत्त प्राचार्यांसह दोघांच्या ४९ लाख ५० हजार रुपयांच्या ठेवीची रक्कम परस्पर शालकासह त्याच्या मित्राच्या खात्यात वळवल्याचे प्रकरण २३ एप्रिलला उघडकीस आले होते. यात सेवानिवृत्त प्राचार्य प्रल्हाद पाटील (७७, रा. मोहिदे त. ह. ता. शहादा) यांच्या ३८ लाख २० हजार २४८ रुपये तर सखाराम पाटील (रा. जुने मोहिदा रो, हादा) यांच्या ११ लाख ३० हजार रुपयांच्या ठेव रकमेचा समावेश होता. या प्रकरणी तक्रार दाखल होताच शहादा पोलिसांनी पालोदकर याच्यासह त्याचा शालक अनिकेत सुनील महाजन (जळगाव) व अनिकेतचा मित्र आदर्श विलास भालेराव (जळगाव) अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तत्परतेने अनिकेत महाजन याला अटक केली असली तरी पालोदकर व भालेराव हे दोघे मात्र फरार झाले होते.
पत्ताच लागेना, नातेवाईकांनीही केले हात वर
आता गेल्या दोन आठवड्यांपासून पालोदकर व भालेराव हे दोघेही फरार असून, शहादा पोलिसांना अद्याप तरी त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांचे पथक पालोदकर याच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पालोद (ता. सिल्लोड) येथील घरीही जावून आले. मात्र, तो इकडे आलाच नसल्याची माहिती नातेवाईकांनी दिल्याने पोलिसांचे पथक रिकाम्या हाताने परतले. पालोदकरचा त्याच्या जळगावस्थित सासुरवाडीतही शोध घेण्यात आला. मात्र, तेथेही तो सापडला नाही. भालेरावच्या बाबतीतही पोलिसांच्या पदरी निराशाच पडली आहे. या दोघांचे फोनही बंद लागत असून, त्यामुळे पोलिसांच्या तपासाला मर्यादा येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले. हे दोघे हाती लागत नाहीत, तोपर्यंत या प्रकरणाचा गुंता सुटण्याची शक्यता घटत चालली आहे.
पोलिसांनी ठरवले तर…
एखाद्या प्रकरणाचा छडा लावण्याचे पोलिसांनी ठरवले तर ते आरोपीला पाताळातूनही शोधून काढतात, असा महाराष्ट्र पोलीस दलाचा दरारा आहे. मात्र, शहाद्याच्या एचडीएफसी प्रकरणात शहादा पोलीस हीच भूमिका का घेत नाहीत, असा प्रश्न फसवणूक झालेल्यांसह एचडीएफसी बँकेच्या या शाखेतील अन्य ठेवीदारांना पडला आहे. सध्या हे दोघेही अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न करीत असल्याची माहिती पुढे येत आहे.
आरोपी वाढणार?
दुसरीकडे, अशा स्वरूपाची काही प्रकरणे उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त होत असून, एचडीएफसी बँकेनेही पालोदकर याची अंतर्गत चौकशी सुरू केली आहे. तर पालोदकर एकटा एवढी मोठी हिंमत करण्याची शक्यता कमी असून, त्यामुळे हे प्रकरण फार मोठे असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली. पालोदकर याने इतर काही जणांची मदत घेऊन वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवून बँकेतील अनेकांच्या ठेवींवर डल्ला मारल्याची शंका आहे. यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणि आरोपींच्या संख्येत वाढ होण्याची शक्यताही या सूत्रांनी व्यक्त केली. त्याचवेळी एचडीएफसी बँकेकडून याबाबत कोणतेही भाष्य करण्यात येत नसल्याने या प्रकरणाचे गुढ वाढले आहे.



