तळोद्यात भीषण अपघात : ट्रकच्या स्टेपनी टायरचा स्फोट; दूरवर फेकला जावून चालक जागीच ठार

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सिमेंटने भरलेल्या मालवाहतूक ट्रकच्या टायरचा स्फोट होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना तळोदा शहरात आज, बुधवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर झालेल्या या भीषण अपघातात ठार झालेला ट्रकचालक धुळे जिल्ह्यातील नरडाना येथील असल्याचे समजते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमएच १८ बीजी २८७४ या क्रमांकाचा १२ टायर असलेला ट्रक सुमारे २५ टन सिमेंट घेऊन माल उतरवण्यासाठी आला होता. एका जागी थांबल्यानंतर चालकाला सोबत असलेल्या स्टेपनी टायरमध्ये अतिरिक्त हवा साठवण्यात आल्याची शक्यता वाटली. खात्री करून घेण्यासाठी त्याने खाली उतरून त्या टायरची तपासणी सुरू केली. याचदरम्यान त्या टायरचा अचानक जोरदार स्फोट झाला.
टायरमधील हवेच्या प्रचंड दाबामुळे झालेला स्फोट अत्यंत तीव्र स्वरूपाचा होता. स्फोटाची तीव्रता इतकी होती की त्याचे कपडे फाटून गेले आणि तो अक्षरशः काही अंतरावर फेकला जावून जमिनीवर आदळला. यात त्याच्या छातीवर दाब पडल्यामुळे बरगड्यांना जबर मार लागला. तसेच आपटला गेल्याने डोके व हातालाही गंभीर दुखापती झाल्या. या सार्यांमुळे अवघ्या काही क्षणांतच त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून ॲम्बुलन्सला पाचारण केले. काही वेळातच ॲम्बुलन्स घटनास्थळी दाखल झाली. तसेच काही वेळातच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. यानंतर ट्रकचालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सरकारी रुग्णालयात नेण्यात आला. दरम्यान, सध्या तळोदा पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



