नंदुरबार जिल्हा

शहाद्यात भाजपनं करून दाखवलं : नगरपालिकेकडे फिरवली पाठ, विशेष सभा अखेर कोरमअभावी तहकूब!

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अवघ्‍या २० दिवसांच्‍या अंतराने आज बुधवारी (दि. ६) बोलावण्‍यात आलेली शहादा नगर परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा अखेर कोरमअभावी रद्द करण्‍यात आली. नगराध्‍यक्ष अभिजित पाटील मनमानी करीत असल्‍याचा आरोप करीत भारतीय जनता पक्षाच्‍या २२ नगरसेवकांनी नगराध्‍यक्षांनी निश्‍चित केलेला सभेचा अजेंडा मान्‍य करण्‍यास नकार देत आजच्‍या सभेवर बहिष्‍काराचा इशारा दिला होता. भाजपच्‍या सदस्‍यांनी हा शब्‍द खरा करून दाखवत नगर पालिकेकडे पाठ फिरवली आणि परिणामी सभा तहकुब करण्‍याची नामुष्‍की प्रशासनावर आली.
शहादा नगर पालिकेत भारतीय जनता पक्ष व जनता विकास आघाडी असे दोन वेगवेगळे गट कार्यरत आहेत. त्यात नगराध्यक्ष जनता विकास आघाडीचे तर बहुमत व उपनगराध्यक्षपद तसेच विविध समित्या भाजपकडे आहेत. याआधी नगर पालिकेची सर्वसाधारण सभा १७ एप्रिलला झाली होती. त्‍यानंतर दोन्‍ही बाजूच्‍या सदस्‍यांनी शहरातील विकासाच्‍या मुद्द्यावर चर्चा करण्‍यासाठी पुन्‍हा विशेष सभा घेण्‍याची मागणी केली होती. त्‍यानुसार आज ही विशेष सर्वसाधारण सभा बोलावण्‍यात आली होती.
पालिकेच्या सभागृहात दुपारी तीन वाजता ही सभा होणार होती. यावेळी नगराध्यक्ष अभिजीत पाटील, प्रभारी मुख्याधिकारी हर्षल सोनवणे, जनता विकास आघाडीचे नगरसेवक तसेच पालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. मात्र, भारतीय जनता पक्षाच्या एकाही नगरसेवकाने सभेला हजेरी लावली नसल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि सभा तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यालयीन अधीक्षक गोसावी यांनी सांगितले की, सभेचा अजेंडा संकेतस्थळावर तसेच पालिकेच्या नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला होता. तसेच ३० एप्रिल रोजी सर्व नगरसेवकांना अजेंडा पाठविण्यात आला होता. मात्र, ३३ पैकी २१ नगरसेवकांनी अजेंडा स्वीकारला नाही, तर १२ नगरसेवकांनी तो स्वीकारला होता.
एकूण सदस्यसंख्येच्या एक तृतीयांश सदस्यांची उपस्थिती आवश्यक असताना ती पूर्ण न झाल्यामुळे नियोजित विषयांवर चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे ही महत्त्वाची सभा तहकूब करण्यात आली असून पुढील तारखेबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
भाजपने नाकारला होता अजेंडा
आजच्‍या सभेत शहराच्या विकासासंबंधित विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले जावून पायाभूत सुविधा, रस्त्यांची कामे, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर नागरी सुविधांबाबत चर्चा होण्याचे संकेत दिले गेले होते. मात्र, नगराध्‍यक्षांनी निश्‍चित केलेला सभेचा अजेंडा मान्‍य करण्‍यास नकार देत सभेवर बहिष्‍काराची घोषणा केली होती. त्‍यामुळे कालपासूनच या सभेवर अनिश्‍चिततेचे सावट पसरले होते आणि आज अखेर झालेही तसेच.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button