तळोद्याचे गटशिक्षणाधिकारी बालंबाल बचावले; रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे कार अडकली ‘राजपथ बायपास’वरील नाल्यात, दैव बलवत्तर म्हणून बाहेर पडण्यात आले यश!

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर आज बुधवारी (दि. ६) मोठ्या संकटातून बचावले. शहरातील राजपथ बायपास रस्त्यावरील अपूर्ण कामामुळे सकाळी दहा वाजेच्या सुमारास धनगर यांची स्विफ्ट कार नाल्यात अडकली. नाल्यात साचलेल्या पाण्यामुळे खोलगट भागाचा अंदाज न आल्याने कारची डाव्या बाजूची चाके पूर्णपणे पाण्यात बुडाली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून धनगर यांनी तत्काळ वाहनाबाहेर येत स्वतःची सुटका करून घेतली. या अपघातात सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.
घटनेनंतर नगरसेवक कपिल कर्णकार व स्थानिक रहिवाशांनी धनगर यांची कार बाहेर काढण्याचे प्रयत्न केले; मात्र यश न आल्याने शेवटी ट्रॅक्टरच्या साह्याने वाहन पाण्यातून बाहेर काढण्यात आले. या वेळी वैभव कर्णकार, सम्राट महाजन, दीपक पाडवी, अक्षय जोहरी यांनी मदत केली.
दरम्यान, राजपथ रस्त्यावरील नाल्याचे काम अनेक महिन्यांपासून अपूर्ण असून, त्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पाण्याखाली हा भाग दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. संबंधित विभागाने तातडीने काम पूर्ण करून धोका दूर करावा, अशी मागणी स्थानिकांकडून सुरू असली तरी त्याकडे अधिकारी दूर्लक्ष करीत असल्याने नाराजीचे वातावरण आहे.



