‘ओंकार’ समूहाची घोडदौड सुरूच; बदनामी कराल तर महागात पडेल, अफवा पसरवणार्यांना ओमराजे बोत्रे पाटील यांचा कडक शब्दांत इशारा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : राज्यात शेतकऱ्यांना सर्वात जास्त बाजारभाव देणारा उद्योग समूह अशी ओळख ओंकार साखर कारखाना उद्योग समूहाने निर्माण केली आहे. विश्वासार्हता जपणारा म्हणून ओळख असलेल्या या उद्योग समूहाची गेल्या काही दिवसांपासून समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. आता या बदनामी करणार्यांना उद्योग समूह धडा शिकविणार असल्याचे या समूहाचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी म्हटले आहे.
कारखान्याच्या परिस्थितीसह आर्थिक देण्यांबाबत समाज माध्यमांत केल्या जाणार्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर उद्योग समूहाने पत्रक काढून वस्तूस्थितीची माहिती दिली आहे. हा उद्योग समूह १७ कारखाने यशस्वीरीत्या चालवत आहे. बाबुराव बोत्रे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक बंद पडलेले साखर कारखाने भाडेतत्त्वावर घेऊन ते समूहाच्या वतीने योग्य पद्धतीने चालविले जातात. या उद्योग समूहाकडे १८ हजार कर्मचारी, २.९५ लाख टोळी चालक व कामगार आणि आठ लाख शेतकऱ्यांचा मोठा परिवार आहे. यावर्षी जवळपास ७५ लाख टन उसाचे गाळप केले आहे.
असे असताना ओंकार उद्योग समूहाने २ ते ३ हजार कोटी रुपये थकवल्याच्या वावड्या सोशल मीडियावर उठवल्या जात आहेत. प्रत्यक्षात यावर्षी राज्यात १४० खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी गळीत हंगाम चालवला असून, १५ जानेवारीनंतरची सुमारे २१०० कोटी रुपयांची एफआरपी प्रलंबित आहे. या तुलनेत ओंकार उद्योग समूहाने १,८३० कोटी रुपये पेमेंट अदा केले असून, वाहतूकदारांना ७१० कोटी रुपये दिले आहेत. यंदा समूहाचा टर्नओव्हर एक हजार कोटींच्या वर असून, पुढील वर्षी तो ७ हजार कोटींपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे.
बदनामी सहन न करण्याचा इशारा
असे असताना कारखाना व समूहाची बदनामी केली जात असून, रविराज साबळे पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन ओंकार उद्योग समूहाची प्रतिमा मलीन करीत आहे. या प्रकरणी त्याच्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल केले गेले असून, लवकरच अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असे ओमराजे बोत्रे पाटील यांनी म्हटले आहे. ओंकार उद्योग समूहाची कोणत्याही स्वरूपाची बदनामी सहन केली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला.



