नंदुरबार जिल्हा

शहाद्याचे भूमी अभिलेख कार्यालय राम भरोसे; अधिकारी, कर्मचार्‍यांच्‍या नियमित उपस्‍थितीची बोंब, नागरिक-शेतकरी त्रस्त, चौकशीची मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे भूमी अभिलेख कार्यालय गेल्या सहा महिन्यांपासून वरिष्ठांच्या दुर्लक्षामुळे अक्षरशः अनागोंदीच्या स्थितीत सापडले आहे. कार्यालयात वरिष्ठ अधिकारी नियमितपणे उपस्थित नसल्याने शेतकरी, व्यवसायिक आणि सामान्‍यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील प्रांत कार्यालयाच्या आवारात असलेले हे कार्यालय नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा पुरवणारे केंद्र मानले जाते. मात्र, येथील ढिसाळ कारभारामुळे अनेकांची कामे प्रलंबित राहत आहेत. विशेषतः काही व्यवसायिकांच्या जमिनींचे क्षेत्रफळ ऑनलाईन नोंदीतून गायब झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
महत्त्वाचे दस्तावेज आणि नकाशे ऑनलाईन प्रणालीतून कशा प्रकारे गाळ झाले, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. एवढी गंभीर बाब घडूनही संबंधित वरिष्ठ अधिकारी किंवा प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली जात नसल्याने शेतकरी व व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या कार्यालयातील सुरू असलेल्या अनास्था व गैरकारभारावर तातडीने नियंत्रण आणून संबंधितांवर कारवाई करावी, तसेच नागरिकांना सुरळीत सेवा मिळावी, अशी मागणी शेतकर्‍यांसह इतरांकडून करण्यात येत आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही स्थानिकांकडून देण्यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button