पेट्रोल टाकून जिवंत जाळणार्यास जन्मठेप अन् पाच हजारांचा दंड; नंदुरबारच्या न्यायालयाचा निकाल; दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून केले होते कृत्य

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : दारूसाठी पैसे न दिल्याच्या रागातून गावातीलच एकाला जिवंत जाळणार्यास नंदुरबारच्या जिल्हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. दोन वर्षांपूर्वी नंदुरबार तालुक्यातील धानोरा गावात या घडलेल्या या घटनेत चंदू सामा वळवी (५२) याचा जीव गेला होता. तर नांदर्या उर्फ नंदिर दिवाण वळवी (३६, रा. धानोरा) असे हे अमानवी कृत्य केल्यामुळे न्यायालयाने शिक्षा ठोठावलेल्या तरुणाचे नाव आहे.
२ सप्टेंबर २०२४ रोजी पोळ्याच्या दिवशी चंदू सामा वळवी हे धानोरा गावातीलच बँकेच्या एटीएमच्या पायरीवर बसून जेवण करीत होते. याचवेळी तेथे आलेल्या नांदर्या वळवी याने चंदू यांच्याकडे ‘पोळा असल्याने दारू पिण्यासाठी पैसे दे’ अशी मागणी केली. यावर चंदू वळवी यांनी त्याला आपल्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. यामुळे संतापलेल्या नांदर्याने सोबत आणलेल्या पिशवीतून पेट्रोलची बाटली काढून त्यातील पेट्रोल चंदूच्या शरीरावर ओतले आणि काही कळण्याच्या आतच त्याला पेटवून दिले.
यानंतर काही जणांनी चंदू वळवी याला गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार घेत असताना त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी नांदर्या वळवी याच्या विरोधात नंदुरबारच्या उपनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक नंदहरी बडवर यांनी नांदर्याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांनी योग्य दिशेने तपास करून सबळ पुराव्यांसह त्याच्याविरोधात अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. साक्षी आणि पुराव्यांची दखल घेत न्यायालयाने नांदर्या उर्फ नंदिर वळवी याला जन्मठेप आणि पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड. तुषार कापडिया आणि ॲड. महेश पाडवी यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक हेमंत मोहिते, हवालदार नितीन साबळे, शैलेंद्र जाधव, देवेंद्र पाडवी यांनी काम पाहिले.


