नंदुरबारमध्ये शिवसेना विरूद्ध भाजप संघर्ष; आता पाण्यावरून भिडले, दोन दिवसाआड पुरवठ्यावरून भाजपचा संताप; निर्णय मागे घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार शहरात शिवसेना विरूद्ध भारतीय जनता पक्ष असा संघर्ष पुन्हा एकदा टिपेला पोहोचला आहे. शहरात दोन दिवसांआड पाणी पुरवठा करण्याचा नगर पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा निर्णय भाजपच्या पचनी पडला असून, या निर्णयाविरोधात पक्षाने थेट जिल्हाधिकार्यांकडे धाव घेत निर्णय मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
नंदुरबार नगर पालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढलेल्या शिवसेना व भाजप यांच्यात शहरात अनेक मुद्द्यांवरून आजवर मतभेद झाले आहेत. प्रत्येक मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून परस्परांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र नंदुरबारकरांनी पाहिले आहे. आताही शहरातील पाणी पुरवठ्याच्या विषयावर दोन्ही पक्ष परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. नगराध्यक्षा रत्ना रघुवंशी यांनी शहरात दोन दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची घोषणा चार दिवसांपूर्वी केली होती. आता या निर्णयाविरोधात विरोधी पक्ष असलेल्या भाजपने थेट जिल्हाधिकार्यांचे दार ठोठावले आहे.
भाजपच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि. ८) जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची भेट घेत नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली. माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात भाजपाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी हे निवेदन सादर केले.
धरणात मुबलक पाणी, तरी निर्णय का – भाजपचा सवाल
नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणामध्ये सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना नगरपालिकेकडून दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय नागरिकांसाठी अन्यायकारक व त्रासदायक ठरणारा आहे. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना आधीच पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागत असून, अशा परिस्थितीत पाणीपुरवठ्यात कपात करणे योग्य नसल्याचे भाजपने जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. शहरातील नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी नगरपालिकेने तातडीने निर्णयाचा पुनर्विचार करून पूर्वीप्रमाणे एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू ठेवावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी, नगरसेवक आनंदा माळी, लक्ष्मण माळी, भाजपा शहराध्यक्ष नरेश कांकरिया, आकाश चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेविका नीता मराठे, दीपक चौधरी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



