महाराष्ट्र

अवघे नवापूर बर्ड फ्‍लूच्‍या विळख्‍यात; आणखी तीन पोल्‍ट्रीमधील अहवाल पॉझिटिव्‍ह; आणखी दोन लाख कोंबड्यांच्‍या जीवावर गंडांतर

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूरमध्‍ये आणखी तीन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांना एच५ एन१ (एव्हियन इन्फ्लूएंझा) अर्थात बर्ड फ्‍लू झाल्‍याचा अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याने शहर व परिसरात या आजाराचा विळखा घट्ट होत चालल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. बर्ड फ्‍लूची लागण झाल्‍यानंतर सुमारे अडीच लाख कोंबड्या ठार मारल्‍यानंतरही या आजाराचा उद्रेक वाढल्‍याने आता आणखी काही लाख कोंबड्यांना ठार मारावे लागण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.
नवापुरात एच५ एन१ चे संक्रमण आढळल्‍यानंतर पशुसंवर्धन व दुग्धव्‍यवसाय विभागाने काही क्षेत्रात प्रतिबंध लागू केले होते. आता आणखी पलावाला, साकिस्मा व अशरफ या तीन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांचा बर्ड फ्‍लू संसर्गाचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. हे तिन्ही फार्म ३० एप्रिलला कोंबड्यांना बर्ड फ्‍लूचा संसर्ग झाल्‍याची पहिली घटना उघडकीस आलेल्‍या डायमंड पोल्ट्री फार्मच्या ३ किलोमीटरच्या परिघात आहेत.
नंदुरबारच्‍या पशुसंवर्धन व दुग्‍धव्‍यवसाय विभागाचे उपायुक्‍त डॉ. संजय कचाणे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आता नव्या पॉझिटिव्ह नमुन्यांच्या आधारे तिन्ही फार्मभोवती स्वतंत्र कंटेनमेंट सर्कल तयार केले जातील. ही ठिकाणे यापूर्वी केवळ देखरेख क्षेत्र होती, पण आता येथे सक्रियपणे पशुनाशन मोहीम राबवली जाईल. प्रोटोकॉलनुसार, नव्याने संक्रमित झालेल्या तिन्‍ही पोल्‍ट्री फार्मच्‍या एक कि.मी. परिसरात येणाऱ्या सर्व पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना मारले जाईल.
दरम्‍यान, नवीन नियंत्रण क्षेत्रांमध्ये येणाऱ्या सातपैकी तिन्ही फार्ममध्ये सध्या कोंबड्या नाहीत. परंतु, उर्वरित पोल्‍ट्री फार्ममधील सुमारे दोन लाखांहून अधिक कोंबड्या ठार माराव्‍या लागतील, असा अधिकार्‍यांचा अंदाज आहे. दुसरीकडे, बर्ड फ्‍लूची ताजी प्रकरणे उघडकीस आल्‍यामुळे या रोगाने प्रभावित झालेल्‍या पोल्ट्री फार्मची एकूण संख्या वाढून १९ झाली आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी प्रतिबंधात्मक मोहिमेचा विस्तार करून पक्षी मारण्याच्या उपाययोजना अधिक वेगाने राबवल्या, ज्यामुळे मारल्या गेलेल्या पक्ष्यांची संख्या चार लाखांहून अधिक होऊ शकते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button