नवापूर तालुक्यात भीषण अपघात; ट्रकने प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षाला उडवले; एका महिलेचा मृत्यू, तीन वर्षीय बालकासह ८ गंभीर जखमी

नवापूर (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : भरधाव ट्रकने प्रवासी वाहतूक करणार्या रिक्षाला दिलेल्या जबर धडकेत एका महिलेचा मृत्यू तर आठ जण गंभीर जखमी झाल्याची दुर्घटना नवापूर तालुक्यातील सावरट गावाजवळ घडली. जखमींमध्ये एका तीन वर्षीय बालकाचाही समावेश आहे. संगिता पंडित भिल (३२, रा. केलपाडा, ता. नवापूर) असे या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश नामदेव बिर्हाडे (४५) यांचा ॲपेरिक्षाने (क्र. एमएच १९ डब्ल्यूबी १२११) प्रवाशी वाहतूक करण्याचा व्यवसाय आहे. भल्या पहाटे ते नेहमीप्रमाणे रिक्षात प्रवासी बसवून निघाले असता नागपूर - सुरत महामार्गावर सावरट गावाजवळ हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ ही रिक्षा पोहोचताच ट्रक (क्र. एमएच १९ सीएक्स ०६४६) च्या चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून या रिक्षाला चालकाच्या बाजूने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की यामुळे रिक्षातील सर्व ८ प्रवासी व रिक्षाचालक रस्त्यावर फेकले गेले. यात संगिता पंडित भिल या महिलेला वर्मी घाव लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. तर इतर आठ जण गंभीर जखमी झाले. यात रिक्षाचालक राकेश नामदेव बिर्हाडे तसेच प्रवासी मंजूबाई दिवाणजी गावित (६५), सुपडीबाई जेनस्या गावित (४०), नीताबाई सुरूपसिंग गावित (४०), उपा आकाश भिल (२४), निशा सुरज वळवी (२५), पायल अरबाज पठाण (२५) आणि महम्मद अरबाज पठाण (३, सर्व रा. विसरवाडी, ता. नवापूर, जि. नंदुरबार) यांचा समावेश आहे. त्यांना तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
या अपघातानंतर ट्रकचालक सुरेश राजू भरवाड (२४, रा. सुभाषवाडी, ता. जि. जळगाव) हा अपघातग्रस्तांना मदत न करता आणि पोलिसांना माहिती न देता घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस हवालदार नितीन नरसी नाईक यांच्या फिर्यादीवरून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



