नंदुरबार जिल्हा

शहादा- तळोद्यातील ७७ दिव्यांगांच्या जीवनात नवी उमेद; आ. राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहादा-तळोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित ‘मोफत कृत्रिम अवयव प्रत्यारोपण’ शिबिराने अनेकांच्या आयुष्यातील अंधार दूर केला आहे. या शिबिरात शहादा आणि तळोदा तालुक्यातील एकूण ७७ पात्र लाभार्थ्यांना मोफत कृत्रिम हात आणि पाय बसवून त्यांना सन्मानाने चालण्याचे बळ देण्यात आले. ​
आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकतेच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. यात कै. कलावती पाडवी फाउंडेशन, एलआयएमसीओ ट्रस्ट आणि मध्य प्रदेशातील एसआरएस ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य शिबिर हा सर्वात महत्त्वाचा आणि कौतुकास्पद उपक्रम ठरला. या शिबिरात शहादा येथील ४५ पात्र लाभार्थ्यांना तर ​तळोदातील ३२ पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यासह २०० पेक्षा जास्त रुग्णांची तज्ज्ञांमार्फत शारीरिक तपासणी करण्‍यात आली.
​या शिबिरात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील नामवंत अस्थिरोग तज्ज्ञांनी उपस्थित राहून रुग्णांची तपासणी केली. कॅलिपर्सची आवश्यकता असलेल्‍या रुग्‍णांचे जागीच मोजमाप घेण्यात आले. कृत्रिम अवयव मिळाल्यानंतर अनेक रुग्णांनी चालण्यासह वस्तू उचलण्याचा सराव केला. यावेळी लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास व आनंद ओसंडून वाहत होता.
​आ. राजेश पाडवी यांच्या मातोश्रींच्या नावे असलेल्या ‘कै. कलावती पाडवी फाउंडेशन’च्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांपासून जनसेवेचा अखंड वारसा जपला जात आहे. कृत्रिम अवयवच नव्हे, तर ​हृदयरोग आणि इतर गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियांसाठी मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशातील मोठ्या रुग्णालयांमध्ये मोफत उपचार मिळवून दिले जातात.​ क्षेत्रातील हजारो गरजू रुग्णांना या फाउंडेशनने आजवर आरोग्य कवच पुरवले आहे. ​
यावेळी आ. राजेश पाडवी, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, शहाद्याच्‍या उपनगराध्यक्षा माधवी पाटील, शहादा शहराध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, सुनिल पाटील, विनोद जैन, विशाल पाटील, मोतीलाल जैन, नगरसेवक कल्पेश पटेल, तळोद्याचे माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, तळोदा शहराध्यक्ष गौरव व जितेंद्र सूर्यवंशी, नारायण ठाकरे, दरबार दादा योजनेचे प्रमुख डॉ. किरण पावरा, अनिल ठाकरे यांच्यासह आजी-माजी नगरसेवक भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button