प्रकाशातील मंदिराच्या सभा मंडपासाठी आ. रघुवंशींकडून २५ लाख; सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर केली गौतमेश्वर मंदिराची पाहणी
प्रकाशा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आगामी सिंहस्थ पर्वणीच्या पार्श्वभूमीवर आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी दक्षिण काशी प्रकाशातील विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले असून, नुकतीच त्यांनी प्रकाशातील विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी गौतमेश्वर महादेव मंदिराच्या सभा मंडपासाठी आमदार निधीतून २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली.
सिंहस्थ मेळा हा अतिशय महत्त्वाच्या व प्रमुख धार्मिक सोहळा असून, सिंहस्थाच्या काळात नाशिक-त्र्यंबकेश्वरसह प्रकाशातही सिंहस्थ पर्वाचे आयोजन केले जाते. या कालावधीत लाखो भाविक दर्शनासह स्नानासह प्रकाशात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरातील मंदिरांच्या परिसरासह गावात विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. याच विकास कामांच्या नियोजनाच्या दृष्टिकोनातून आ. रघुवंशी यांनी गावात पाहणी केली.
सुरक्षा, सुविधेवर चर्चा; विकास कामांना गती देण्याची मागणी
आ. रघुवंशी यांच्या दौर्यात मंदिराच्या प्रांगणात आयोजित बैठकीत सिंहस्थ पर्वणीच्या मानकरींनी तक्रारींचा पाढा वाचला. सिंहस्थ पर्वणी अवघ्या एका वर्षावर येऊन ठेपली असताना मंदिर परिसरातील विकासकामांना अद्याप गती मिळालेली नसल्याबद्दल उपस्थितांनी नाराजी व्यक्त केली. पर्वणीदरम्यान ८ ते १० लाख भाविक येण्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या सुविधा, सुरक्षा व मंदिर परिसरातील व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
घुमटच्या जीर्णावस्थेवर नाराजी
मंदिर परिसराची पाहणी केल्यानंतर आ. रघुवंशी यांनी गौतमेश्वर महादेव मंदिराची पाहणी करताना मंदिराच्या घुमटाची अत्यंत जीर्ण अवस्था झाल्याचे निदर्शनास आणले. घुमट केव्हाही कोसळू शकतो, अशी परिस्थिती असल्याची खंत त्यांनी व्यक्त करत मंदिरासमोर व समोरील बाजूस घाट नसल्याने भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी शहादा नगराध्यक्ष अभिजीत पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र दशरथ पाटील, हरी पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिलीप चौधरी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील, सिंहस्थ पर्वणीचे मानकरी दुर्गेश पाटील, प्रल्हाद पाटील, पंढरीनाथ पाटील, नंदुरबार नगरसेवक कुणाल, माजी सरपंच जंग्या भील, भावडू ठाकरे, अमृत ठाकरे, सतीश पाटील, अमृत भील, शरद पाटील, सत्यानंद पाटील, उज्वल भोई, महेंद्र भोई, पंडित धनराळे, प्रवीण चित्ते, प्रकाश ठाकरे, सुनील कोळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



