महाराष्ट्र

नंदुरबारला ‘ताप’ : तापमानाचा पारा ४५ अंशांच्‍या घरात; थेट अकोल्‍याशी स्‍पर्धा; आणखी तीन दिवस काळजीचे!

नंदुरबार (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : ‘वाढता वाढता वाढे’ या उक्‍तीप्रमाणे नंदुरबार शहर आणि जिल्‍ह्यात तापमानाचा पारा उच्‍चांक गाठत आहे. सध्‍या नंदुरबार जिल्‍ह्यात तापमानाचा पारा ४५ अंशांच्‍या घरात पोहोचला असून, तापमानाच्‍या बाबतीत नंदुरबारची स्‍पर्धा सर्वाधिक तापमानाची नोंद असणार्‍या अकोला शहर व जिल्‍ह्याशी सुरू असल्‍याचे दिसत आहे. त्‍यातच आणखी तीन ते चार दिवस उष्‍णतेची लाट राहणार असल्‍याचा इशारा पुण्‍याच्‍या हवामान विभागाने दिल्‍याने सर्वांचीच चिंता वाढली आहे.
मार्च आणि एप्रिल महिन्‍यातच जीव नकोसे करणारे ऊन अर्धा मे महिना उलटत असताना देखील पाठ सोडायला तयार नाही. विदर्भासोबतच खानदेशातही उष्‍णतेची लाट आली असून, या प्रदेशातील सर्वात ‘हॉट डेस्‍टिनेशन’ असलेल्‍या भुसावळात यंदाच्‍या हंगामातील सर्वाधिक ४५.८ अंश सेल्‍सियस तापमानाची नोंद झाली. याशिवाय जळगाव, धुळे आणि नंदुरबारमध्‍येही तापमानाचा पारा ४५ अंशांवर पोहोचला आहे. यंदाच्‍या हंगामात नंदुरबारचे हे सर्वाधिक तापमान राहिले आहे.
जनजीवन विस्‍कळीत, रस्‍त्‍यावर शुकशुकाट
प्रचंड उष्णतेमुळे नंदुरबार जनजीवन विस्कळीत झाले असून, दुपारच्या वेळेत रस्ते अक्षरशः निर्मनुष्य दिसत आहेत. दिवसभर कडक ऊन व उष्ण वाऱ्यांमुळे लोक अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळत असून, बाजारपेठा, चौक व सार्वजनिक ठिकाणे ओस पडली आहेत. शेतकरी, बांधकाम मजूर, रिक्षाचालक व इतर मैदानी काम करणाऱ्या कामगारांना उन्हाचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत आहे. उन्हाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन बदलले आहे. सकाळपासूनच उन्‍हाचा चटका जाणवत असून, दुपारच्या वेळेत तर शेतात काम करणे अवघड झाले आहे.
आणखी तीन दिवस जोखमीचे; आरोग्‍य विभागाचा काळजीचा सल्‍ला
राज्‍यात पुढील तीन दिवस उष्णतेची लाट राहणार असल्याचा इशारा पुणे हवामान विभागाचे सायंटिस्ट सखाराम सानप यांनी दिला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात उच्चांकी तापमान राहणार असल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे. पुढील ३ दिवस उष्माघाताचा धोका राहणार असून, उष्माघाताची रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. त्‍याचवेळी आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना उन्‍हात बाहेर न पडण्याचा सल्ला दिला असून पुरेसे पाणी पिणे, हलके व सैल कपडे परिधान करणे आणि डोक्याचे संरक्षण करणे आवश्यक असल्याचे सांगितले आहे. उष्माघाताचा धोका वाढल्याने सर्वांनीच सतर्क राहून स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन जिल्‍हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनीही केले आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button