Good News : डामरखेडातील गोमाई नदीवरील नवीन पूल जून-जुलैपर्यंत होणार पूर्ण; जिल्हाधिकार्यांनी दणका देताच यंत्रणा गतिमान

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार-कोळदा-खेतिया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील शहादा तालुक्यातील डामरखेडा येथील गोमाई नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम लवकरच पूर्ण होण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. आतापर्यंत सुमारे ५० टक्के काम पूर्ण झालेल्या या पुलाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी करून कामात गती आणण्याच्या सूचना देताच संबंधित यंत्रणांना गतिमान झाल्या आहेत. यामुळे येत्या जून किंवा जुलै महिन्यापर्यंत पुलाचे संपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गोमाई नदीवरील जुना पूल जीर्ण झाल्यामुळे तसेच वाहतुकीच्या वाढत्या ताणामुळे या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. सध्या पुलाच्या खालच्या भागाचे काम युद्धपातळीवर सुरू असून पुढील आठवडाभरात “पावर कॅप” टाकण्याचे काम पूर्ण होणार आहे. पावसाळ्यापूर्वी पुलाचे मुख्य फाउंडेशन आणि खालचा भाग पूर्ण करून पावसाळ्यात वरच्या भागाचे काम अडथळ्याशिवाय सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी पुलाच्या कामाचा आढावा घेताना गुणवत्तेबाबत तडजोड न करण्याच्या सूचना दिल्या. तसेच आवश्यक यंत्रसामग्री वेळेत उपलब्ध करून न दिल्यामुळे संबंधित एजन्सीला नोटीस बजावण्यात आल्याची माहितीही दिली. कामाचा वेग वाढवून ३१ मेपूर्वी महत्त्वाचे टप्पे पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. यावेळी महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित बांधकाम एजन्सीचे प्रतिनिधी तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
तूर्तास अवजड वाहतुकीस बंदी
नवीन पुलाच्या कामामुळे जुन्या पुलावरून अवजड वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. जुन्या पुलाच्या दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला असून, भविष्यात जुन्या पुलाचेही मजबुतीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
नंदुरबार ते खेतिया दरम्यानचा हा राष्ट्रीय महामार्ग व्यापारी, शैक्षणिक आणि दैनंदिन वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राला जोडणारा हा मार्ग असल्यामुळे दररोज हजारो वाहनांची या मार्गावरून ये-जा होते. आता गोमाई नदीवरील नवीन पूल पूर्ण झाल्यानंतर वाहतूक अधिक सुरक्षित, वेगवान आणि सुरळीत होणार असून परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण होणार आहे.



