गुन्हे वार्ता

सुधारित बातमी : लोय पिंपळोदचा ‘लखोबा लोखंडे’ : गोड बोलून विश्‍वास संपादन करीत एकीला ८.२५ लाख, तर दोघांना २ लाखांना गंडा; गोडबोल्‍या यश पाटीलला शहादा पोलिसांकडून बेड्या

शहादा (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून संपर्क साधायचा, मग ओळख वाढवायची अन्‌ शेवटी गोड बोलून आर्थिक व्‍यवहार करून समोरच्‍याला गंडा घालायचा अशी ‘लखोबा लोखंडे स्‍टाईल’ ‘मोडस ऑपरेंडी’ असलेला एक भामटा शहाद्यातील एका धाडसी तरुणीच्‍या तक्रारीमुळे शहादा पोलिसांच्‍या जाळ्‍यात अडकला आहे. यश राजेंद्र पाटील (रा. लोय पिंपळोद, ता. व जि. नंदुरबार) असे या भामट्याचे नाव असून, सध्‍या तो पोलिसांच्‍या कोठडीची हवा खात आहे.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सोनाली आशिष पाटील (२२, रा. शांतीवन सोसायटी, शिरूड रोड, शहादा) असे या प्रकरणात फिर्याद दाखल केलेल्‍या धाडसी तरुणीचे नाव आहे. सोनाली व यश यांची काही महिन्‍यांपूर्वी इन्‍स्‍टाग्राम या सोशल मीडिया साईटच्‍या माध्‍यमातून ओळख झाली होती. यानंतर यशने तिच्‍याशी संवाद वाढवला. पुढे हाच सिलसिला कायम ठेवत यशने सोनाली यांच्‍याशी घट्ट मैत्री करून त्‍यांचा विश्‍वास संपादन केला. नंतर तो त्‍यांच्‍या घरापर्यंत पोहोचला.
यशच्‍या गोड बोलण्‍याला भूलून सोनाली यांनी त्‍याच्‍या प्रत्‍येक बोलण्‍यावर विश्‍वास ठेवला. सोनाली पाटील या आपल्‍या जाळ्‍यात पुरत्‍या अडकल्‍याचे लक्षात आल्‍यानंतर यशने ‍त्‍यांच्‍यासमोर अडचणींचा पाढा वाचून त्‍यातून बाहेर पडण्‍यासाठी सोन्‍याच्‍या दागिन्‍यांची मागणी केली. सोनाली यांनीही मागचा पुढचा विचार न करता तब्‍बल सव्‍वा आठ लाख रुपयांचे दागिने यशच्‍या हवाली केले. यात सोन्‍याची चेन, अंगठ्या, ब्रेसलेट, कानातील लटकन आदी दागिन्‍यांचा समावेश आहे. एकदा दागिने हाती आल्‍यानंतर यशने सोनाली यांच्‍याशी संवाद कमी केला. दागिने परत करण्‍यासाठीही तो टाळाटाळ करू लागला. आपली फसवणूक झाल्‍याचे लक्षात आल्‍यानंर अखेर सोनाली यांनी शहादा पोलीस ठाणे गाठून यश पाटील याच्‍याविरोधात ८.२५ लाख रुपयांच्‍या फसवणुकीची फिर्याद नोंदवली.
आणखी दोघांना दोन लाखांना गंडा
यश पाटील याने याच पद्धतीने आणखी दोघांची सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक केल्‍याचे समोर आले आहे. यात मणिलाल सखाराम लोहार यांच्‍याकडून ७८ हजार रुपयांची ट्रॉली घेऊन त्‍यांना परतच केली नाही. तर अशाच पद्धतीने हेमराज सिताराम राजपूत यांच्‍याकडून सव्‍वा लाख रुपयांचे रोटाव्‍हेटर नंतर पैसे देण्‍याच्‍या बहाण्‍याने घेऊन ते परस्‍पर विकून त्‍यांची फसवणूक केल्‍याचेही समोर आले आहे.
अखेर हाती पडल्‍या बेड्या
सोनाली पाटील यांनी फिर्याद दाखल करताच शहादा पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत यश पाटील याला बेड्या ठोकल्‍या. सध्‍या तो कोठडीची हवा खात असून, त्‍याला न्‍यायालयासमोर उभे केले जाणार आहे. सध्‍या पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्‍या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रदीपसिंग राजपूत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. यश पाटीलच्‍या चौकशीतून अशीच आणखी काही प्रकरणे उघडकीस येण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button