‘पोलीस दल, नेहमीच आपल्या सेवेत तत्पर’ : नंदुरबार जिल्ह्यात आता दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘तक्रार निवारण दिन’!; येत्या शनिवारपासून सुरूवात
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत नागरिकांच्या असलेल्या समस्यांचे तत्काळ निवारण होवून त्यांचा वेळ वाचावा आणि सोशल पोलिसिंगच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधता यावा, या उद्देशाने येत्या शनिवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी ‘तक्रार निवारण दिन’ उपक्रम राबविण्यात येणार आहे.
याआधीही जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन उपक्रम सुरू होता. मात्र, मध्यंतरी त्यात खंड पडला होता. परंतु, आता नव्या पोलीस अधीक्षक म्हणून अश्विनी सानप यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पुन्हा सोशल पोलिसिंगवर भर देण्यास सुरूवात करताना हा उपक्रम नव्याने राबविण्याचे आदेश जिल्हा पोलीस दलाला दिले आहेत.
या अनुषंगाने आता येत्या शनिवारपासून (दि. १६) जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात दर शनिवारी सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, संबंधितांनी या वेळेत उपस्थित राहून आपल्या तक्रारी मांडाव्यात, असे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.



