मुख्य बातम्या

अपेक्षित तेच घडलं : सीएनजीपाठोपाठ पेट्रोल ३ तर डिझेल ३.११ रुपयांनी महागले; चार वर्षांनंतर पहिल्‍यांदाच वाढले दर, नंदुरबार जिल्‍ह्यात काय आहे नवा दर… वाचा…

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आखाती युद्धामुळे निर्माण झालेल्‍या परिस्‍थितीच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन करून काही तास उलटत नाही तोच देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्‍या दरात वाढ करण्‍यात आली आहे. पेट्रोल प्रति लिटर ३ रुपये तर डिझेल ३ रुपये ११ पैशांनी महागले आहे. विशेष म्‍हणजे सीएनजी दरात कालच दोन रुपयांची वाढ करण्‍यात आली होती.
गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात वाढ झाली होती. त्‍याचा परिणाम लवकरच देशांतर्गत ग्राहकांवर होईल, अशी चर्चा सुरू होती. ती आज शुक्रवारी (दि. १५) खरी ठरली आणि तेल कंपन्यांनी इंधनाच्या दरांमध्‍ये सुधारणा केली. आज सकाळी ६ वाजेपासून देशभरात ही दरवाढ लागू करण्‍यात आली आहे.
पंतप्रधानांनी केले होते इंधन बचतीचे आवाहन
सध्याच्या संकटाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परकीय चलन वाचवण्याच्या उद्देशाने काही उपाययोजना करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये इंधनाचा काटकसरीने वापर करणे, सोन्याची खरेदी पुढे ढकलणे आणि परदेश प्रवास स्थगित करणे यांसारख्या गोष्टींचा समावेश होता. युद्धामुळे बदललेल्‍या परिस्‍थितीमुळे रुपयाच्या मूल्यात मोठी घसरण झाली असून, सध्या अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ९५ च्या पातळीच्या खाली घसरले आहे.
असे झाले दर
नव्‍या दरवाढीनुसार आता नंदुरबार जिल्‍ह्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०८ रुपये ११ पैसे तर डिझेलचा दर ९४ रुपये ५९ पैसे असा झाला आहे, अशी माहिती शहाद्यातील आर.सी. पेट्रोलपंपाचे मालक दीपकभाई पटेल यांनी ‘नंदुरबार पोस्‍ट’शी बोलताना दिली.

महत्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहर         नवीन दर (पेट्रोल)    नवीन दर (डिझेल)
नंदुरबार / शहादा १०६.५४            ९३.१४
मुंबई        १०६.५४            ९३.१४
दिल्ली       ९७.७७             ९०.७८

चेन्नई       १०३.८४             ९५.५०
कोलकाता     १०८.४१            ९५.१३
पुणे         १०७.८४            ९४.९५
बंगळुरू       १०२.९६            ९४.१०

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button