नंदुरबार जिल्हा

पुन्‍हा काळरात्र : नवापूर तालुक्‍यात भीषण अपघात; पिकअप वाहन ट्रॉलावर आदळून दोघांच्‍या काळजात घुसल्‍या लोखंडी सळया, जागीच मृत्‍यू

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नवापूर शहरापासून अवघ्‍या काही अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग ५३ वर गुरुवारी रात्री उशीरा झालेल्‍या भीषण अपघातात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्‍यू झाला. गतिरोधकावर हळू झालेल्‍या ट्रॉलावर मागून भरधाव वेगात येणारे पिकअप वाहन आदळून चालकासह सहचालकाचा बळी गेला. रात्री १० वाजेच्‍या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, सुरत (गुजरात) ते पारादीप बंदर (ओरिसा) या राष्‍ट्रीय महामार्ग ५३ वर नवापूरनजीक असलेल्‍या उड्डाण पुलानजीक पुना हॉटेलजवळ असलेल्‍या गतिरोधकावर हा अपघात झाला. गुजरातेतून लोखंडी सळया भरून निघालेला ट्रॉलाच्‍या (क्र. जीजे २६ यू ०२७७) चालकाने रात्री दहा वाजेच्‍या सुमारास पुना हॉटेलजवळ पोहोचल्‍यानंतर गतिरोधक पाहून वाहनाचा वेग कमी केला. याचवेळी मागून भरधाव वेगात येणार्‍या पिकअप वाहनाच्‍या (क्र. एनएल ०१ एएच ७७०४) चालकाला याचा अंदाज आला नाही आणि काही कळण्‍याच्‍या आतच हे पिकअप वाहन मागच्‍या बाजूने ट्रॉलावर आदळले.
यात ट्रॉलामधील लोखंडी सळया थेट पिकअप वाहनाचा चालक इलियासभाई गावित (रा. मेढा, ता. सोनगड, जि. वापी, गुजरात) आणि त्‍याचा सहकारी (रात्री उशीरापर्यंत नाव समजू शकले नव्‍हते) या दोघांच्‍याशी शरीरात घुसल्‍या. या दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. रात्रीची शांततेची वेळ असल्‍याने अपघातामुळे झालेला जोरदार आवाज सगळीकडे घुमला. यामुळे इस्लामपुरा परिसर व प्रभाकर कॉलनीतील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना वाहनातून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्‍यात त्‍यांना अपयश आले. अखेर काही जणांनी पोलिसांना माहिती दिल्‍यावर नवापूर पोलिसांनी अपघातस्‍थळी पोहोचून दोघांनाही बाहेर काढले. मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्‍यू झाला होता. तसेच पोलिसांनी अपघातामुळे परिसरात विस्‍कळीत झालेली वाहतूक सुरळित केली.
दरम्‍यान, राष्‍ट्रीय महामार्ग असूनही या ठिकाणी गतिरोधकावर पांढरे पट्टे मारलेले नव्‍हते. तसेच परावर्तक चिन्ह (रिफ्‍लेक्‍टर) आणि सूचना फलकांचा अभाव यामुळेच हा अपघात घडल्याचा आरोप स्‍थानिकांनी केला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button