नंदुरबार जिल्हा

आता झोळी, खाट, खांद्यावरून पेशंट रुग्‍णालयात नेणे बंद; आ. आमश्‍या पाडवींनी दिल्‍या ५ अत्याधुनिक रुग्णवाहिका; दुर्गम सातपुड्यात आरोग्यसेवेची नवी क्रांती

धडगाव (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम सातपुडा परिसरातील आदिवासी बांधवांसाठी आरोग्यसेवा अधिक सक्षम व गतिमान करण्याच्या दृष्टीने आमदार आमश्या पाडवी यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. त्यांच्या स्थानिक विकास निधीतून धडगाव तालुक्यातील पाच दुर्गम ग्रामपंचायतींसाठी मंजूर करण्यात आलेल्या पाच नवीन रुग्णवाहिकांचे लोकार्पण नुकतेच करण्यात आले.
धडगाव येथील एस. व्ही. ठकार विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, आरोग्य कर्मचारी, पदाधिकारी तसेच आदिवासी बांधव उपस्थित होते. या रुग्णवाहिका कात्री, त्रिशूल, घाटली, मांडवी आणि कुंभरी या डोंगरदऱ्यात वसलेल्या अतिदुर्गम गावांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
दुर्गम भागात आरोग्य व्यवस्थेची मोठी समस्या
सातपुड्याच्या डोंगराळ भागात आजही अनेक गावांत रस्ते, दळणवळण व वाहतुकीच्या सुविधा मर्यादित आहेत. पावसाळ्यात तर अनेक गावे संपर्कविहीन होतात. अशा परिस्थितीत गंभीर रुग्ण, गर्भवती महिला किंवा अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहोचवणे आव्हान ठरते. अनेकदा रुग्णांना बांबूच्या झोळीतून, खाटेवरून किंवा खांद्यावरून डोंगर उतरवत मुख्य रस्त्यापर्यंत आणावे लागत असे. उपचार मिळण्यास होणारा विलंब अनेकांच्या जीवावर बेतत होता. विशेषतः कुपोषित बालके आणि गर्भवतींना याचा मोठा फटका बसत होता.
“गोल्डन अवर”मध्ये उपचार मिळणार
नव्‍या रुग्णवाहिकांमुळे दुर्गम भागातील रुग्णांना अत्यावश्यक उपचारासाठी वेळेत रुग्णालयात पोहोचवणे शक्य होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत “गोल्डन अवर”मध्ये उपचार मिळू शकणार असल्‍याने या रुग्णवाहिका आदिवासी जनतेसाठी जीवनदायिनी ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी आ. आमश्या पाडवी यांनी दुर्गम भागातील रहिवाशांना आरोग्याच्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली प्राथमिकता असल्याचे सांगितले.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button