महाराष्ट्र

‘बर्ड फ्‍लू’चा विळखा घट्ट; नवापुरातील आणखी दोन पोल्‍ट्रीमधील अहवाल पॉझिटिव्‍ह; ३४ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून जाहीर; पुनरावृत्तीच्‍या भीतीने शहादा परिसरातही घबराट

नवापूर (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : सुमारे पाच वर्षांनंतर परतलेल्‍या एच५ एन१ (एव्हियन इन्फ्लूएंझा) अर्थात बर्ड फ्‍लू आजाराने नवापूर व परिसराला घातलेला विळखा दिवसागणिक घट्ट होत चालला आहे. नवापूरमध्‍ये आणखी दोन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्‍लू झाल्‍याचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला असून, यामुळे शहर व परिसरातील हजारो कोंबड्यांना ठार मारण्‍याची मोहीम राबवावी लागणार आहे. दुसरीकडे, २०२१ मध्‍ये नवापूरनंतर शहादा परिसरातही कोंबड्यांना बर्ड फ्‍लूची लागण झाली होती. त्‍यामुळे शहादा परिसरातही दहशतीचे वातावरण असून, नवापूर प्रमाणेच शहादासह जिल्‍हाभरातील पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांच्‍या तपासणीची मागणी पुढे येवू लागली आहे.
नवापुरात यंदा सर्वांत प्रथम ३० एप्रिलला चार पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्‍लूची लागण झाल्‍याचा प्रकार समोर आला होता. त्‍यानंतर अवघ्‍या दोन दिवसांतच आणखी तीन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्या या आजाराच्‍या तावडीत सापडल्‍या होत्‍या. आता यात आणखी दोन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांचा समावेश झाला आहे. यामुळे शहर व तालुक्‍यात या आजाराचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. दरम्‍यान, आतापर्यंत तालुक्‍यात ३ लाख ८९ हजार कोंबड्यांचे कलिंग (नष्‍ट करणे) करण्‍यात आले असून, आता त्‍यात आणखी काही हजार कोंबड्यांचा भर पडणार आहे.
३४ गावे प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून जाहीर
नवापुरात एच५ एन१ चे संक्रमण आढळल्‍यानंतर पशुसंवर्धन व दुग्धव्‍यवसाय विभागाने काही क्षेत्रात प्रतिबंध लागू केले होते. नंतर बर्ड फ्‍लूची लागण झालेल्‍या पोल्‍ट्री फार्मच्‍या परिसरातील प्रतिबंधित क्षेत्राची संख्‍या वाढतच गेली. आता आणखी दोन पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांचा बर्ड फ्‍लूचा अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍यानंतर या दोन्‍ही पोल्‍ट्री फार्मच्‍या १० कि.मी. त्रिज्‍येतील तब्‍बल ३४ गावांना प्रतिबंधित क्षेत्र म्‍हणून जाहीर करण्‍यात आले आहे. वाकीपाडा, बेडकीपाडा,  भामरामाळ, बारी, थुवा, रायपूर, जामतलाव, विलमांजरे, बंधारफळी, विजापूर, नांदवन, कोथळा,  भवरे, पांगरान, रायंगन, कोळदा, सावरट, नवी सावरट, उमरान, वावडी, डालीआंबा, पाचांबा,  चिंचपाडा, चेडा, बिलगव्हाण, बोकळझर, पायविहीर, मोरथुवा, करंजी बुद्रुक, चौकी, धनराट,  वळखूट, सोनखडके या गावांचा यामध्‍ये समावेश आहे.
शहादा परिसरात घबराट
नवापुरात बर्ड फ्‍लूची ताजी प्रकरणे उघडकीस आल्‍यामुळे या रोगाने प्रभावित झालेल्‍या पोल्ट्री फार्मची एकूण संख्या वाढून २१ झाली आहे. दुसरीकडे, नवापुर तालुक्‍यात बर्ड फ्‍लूने थैमान घातल्‍यानंतर आता जिल्‍हाभरातील पोल्‍ट्री फार्ममधील कोंबड्यांच्‍या तपासणीची मागणी जोर धरू लागली आहे. विशेषत: २००६ नंतर पुन्‍हा २०२१ मध्‍ये नवापुरात एन्‍ट्री केलेल्‍या बर्ड फ्‍लूने पाठोपाठ शहादा तालुक्‍याला घेरले होते. त्‍यावेळी शहादा तालुक्‍यातही अनेक कोंबड्यांना ठार मारावे लागले होते. आताही नवापूर पाठोपाठ बर्ड फ्‍लू पुन्‍हा शहादा तालुक्‍यात एन्‍ट्री करण्‍याच्‍या भीतीने या तालुक्‍यातील पोल्‍ट्री फार्म मालकांसह कोंबडाप्रेमींची झोप उडाली आहे. महत्त्‍वाचे म्‍हणजे बर्ड फ्‍लूच्‍या भीतीने नवापूरच नव्‍हे तर शहादा आणि जिल्‍हाभरातील कोंबड्या (चिकन) तसेच अंड्यांची विक्री रसातळाला गेली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button