खरीप हंगामाआधीच युरिया, डीएपीच्या तुफान विक्रीमुळे कृषी विभागाने उघडला ‘तिसरा डोळा’!; नंदुरबार जिल्ह्यातील ३१ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित, तर दोघांचे रद्द; पण नावांच्या गोपनीयतेमुळे संभ्रम
शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : खरीप हंगामाची लागवड सुरू होण्याआधीच युरिया आणि डीएपी खताची भरमसाठ विक्री झाल्याने हैराण झालेल्या कृषी विभागाने अखेर कृषी केंद्रांची तपासणी सुरू केल्यानंतर अनेक अनियमिततांचा भंडाफोड झाला आहे. यानंतर कृषी विभागाने तपासणी केलेल्या २५० पैकी तब्बल ३१ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित केले असून, दोन केंद्रांचे परवाने थेट रद्द करण्यात आले आहेत. या कारवाईचे स्वागत होत असले तरी कृषी विभाग या केंद्रचालकांची नावे जाहीर करीत नसल्याने यामागे काहीतरी ‘गोलमाल’ असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या महिन्यात जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामाच्या लागवडीलाही सुरूवात झाली नव्हती. मात्र, याच काळात जिल्हाभरात युरिया आणि डीएपी या खतांच्या विक्रीत मात्र मोठी वाढ झाल्याने कृषी विभागाचे डोळे विस्फारले होते. विशेषत: काही शेतकर्यांनी आवश्यकतेपेक्षा अधिक खतांची खरेदी केल्याचे समोर आले होते. यानंतर कृषी विभागाने तातडीने सर्व २५० कृषी केंद्रांची तपासणी सुरू केली. यात जास्त खत खरेदी दाखवलेल्या शेतकर्यांच्या शेतावर जावून प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली. याअंती कृषी केंद्रांतील प्रत्यक्ष खतसाठा, नोंदी आणि विक्रीत मोठ्या अनियमितता आढळल्या. यानंतर कृषी विभागाने तातडीने कारवाई करीत या गैरकृत्यात सहभागी असलेल्या ३१ कृषी केंद्रांचा परवाना निलंबित केला, तर दोघांचे परवाने थेट रद्द केले.
नावे जाहीर का नाहीत?
कृषी विभागाने केलेल्या या कारवाईचे जिल्हाभरातून स्वागत होत असले तरी या कृषी केंद्रांच्या मालकांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. ही नावे दडवण्यामागे कृषी विभागाचा हेतू नेमका काय असावा, असा संशयास्पद प्रश्नांचा सूर जिल्हाभरातून उमटत आहे. महत्त्वाचे म्हणजे नेमक्या कोणत्या केंद्रांवर आणि कोणत्या कारणांमुळे कारवाई झाली हेही आतापर्यंत जाहीर झालेले नसल्याने सारीच संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यातही खास म्हणजे यावर कृषी विभागाचे अधिकारी बोलायला तयार नसल्याने त्यांना कुणी गप्प बसायला सांगितले, असाही प्रश्न विचारला जावू लागला आहे.



