काही बेरोजगार तरुण झुरळासारखे; काही माध्यमांत जातात, तर काही आरटीआय कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात : सरन्यायाधीशांच्या टिपण्णीने सारेच अवाक्

नवी दिल्ली (वृत्तसंस्था / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : देशातील काही बेरोजगार तरुण झुरळांसारखे असतात. यातील काही जण मीडिया आणि सोशल मीडियावर जातात. तर काही माहिती अधिकार कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करतात, अशी टिपण्णी देशाचे सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी शुक्रवारी केली. एका वकिलाच्या बढती मागणार्या याचिकेच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी या याचिकेवर ताशेरे ओढतानाच व्यवस्थेवर हल्ले करणारे परजीवींसारखे असल्याचे म्हटले.
आपल्याला वरिष्ठ वकिलाला दर्जा द्यावा यासाठी एका वकिलाकडून वारंवार याचिका केली जात होती. शुक्रवारी ही याचिका सुनावणीस आल्यानंतर सरन्यायाधीश सूर्य कांत व न्या. जॉयमाल्या बागची यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्येष्ठत्व मागून मिळत नाही, ते कामातून मिळवावे लागते. ज्येष्ठ वकीलपद हा काही मिरवायचा दागिना आहे का, अशा शब्दांत न्या. बागची यांनी संबंधित वकिलाची कानउघाडणी केली. तर दिल्ली उच्च न्यायालयाने तुम्हाला ज्येष्ठ वकील पद बहाल केले तरी आम्ही ते रद्द करू, असा इशारा सरन्यायाधीश सूर्य कांत यांनी दिला.
याचिकाकर्ता वकिलाने सोशल मीडियावर केलेल्या काही वक्तव्यांवरही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. ‘व्यवस्थेवर हल्ला करणारे परजीवी आधीपासूनच समाजात भरलेले आहेत. तुम्ही त्यात सहभागी होणार का?… काही तरुण झुरळासारखे असतात. ज्यांना रोजगार मिळत नाही किंवा त्यांचे कोणतेही व्यावसायिक स्थान नसते. त्यातील काही जण माध्यमांकडे जातात तर काही जण सोशल मीडियावर जातात. काही जण माहिती अधिकार कार्यकर्ते तर काही कार्यकर्ते बनून व्यवस्थेवर हल्ला करीत सुटतात’, असे सरन्यायाधीश सूर्य कांत म्हणाले.



