नंदुरबार जिल्हा

घ्‍या हो घ्‍या, कचर्‍यापासून तयार केलेले खत घ्‍या : अवघे २०० रुपये टन!; शहादा न.प.चा स्‍तुत्‍य उपक्रम, प्रक्रिया प्रकल्‍पासाठी नगराध्‍यक्ष अभिजित पाटील यांचा पुढाकार

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शहरातील घरोघरी संकलित होणारा ओला व सुका कचरा दोंडाईचा रस्त्यावरील डंपिंग ग्राउंडवर आणला जात असून, तेथे त्याचे योग्य प्रकारे विलगीकरण केले जात आहे. ओल्या कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत तयार करण्यात आले असून हे खत आता शहादा नगर परिषदेतर्फे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे.
शहरातील घनकचरा व्यवस्थापन व डंपिंग ग्राउंडची पावसाळ्यापूर्वी नगराध्यक्ष अभिजीत पाटील यांनी पाहणी केली. यावेळी त्‍यांनी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून तयार केलेले सेंद्रिय खत शेतकऱ्यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून घेऊन जावे असे आवाहन केले.
या खताचा दर २०० रुपये प्रति टन निश्चित करण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांनी खत घेण्यास सुरुवातही केली असून उर्वरित इच्छुकांनी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधावा, असेही नगराध्‍यक्षांनी नमूद केले. यावेळी पालिकेचे अभियंता संदीप सूर्यवंशी, स्वच्छता निरीक्षक राहूल थोरात, प्रज्ञाशील निकम उपस्थित होते.
शहरवासीयांना आवाहन
यावेळी नगराध्‍यक्ष पाटील यांनी शहरवासीयांना स्वच्छतेबाबत आवाहन केले. घरोघरी कचरा संकलनासाठी येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकताना ओला व सुका कचरा वेगळा करूनच द्यावा, कचऱ्याचे स्रोतस्तरावरच विलगीकरण केल्यास पालिकेवरील ताण कमी होईल तसेच शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठी मदत होईल, असे ते म्‍हणाले. तर शहरातील स्वच्छता व  पर्यावरण संवर्धनासाठी नगरपालिका विविध उपाययोजना राबवत असून, शहरवासीयांनी त्यात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

“पावसाळ्यात शहरातील कचरा विल्हेवाट करताना डम्पिंग ग्राउंडवर जागेची समस्या निर्माण होऊ नये यासाठी पालिकेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. शहरातील कचरा डम्पिंग ग्राउंडमध्येच टाकावा. कचऱ्याचे बायोमायनिंग करून खत तयार केले असून, आवश्यकतेनुसार शेतकऱ्यांनी पालिकेच्या स्वच्छता विभागाशी संपर्क साधून हे खत घेऊन जावे.
– अभिजीत पाटील (नगराध्यक्ष, शहादा)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button