इंधनासाठी नंदुरबारकरांचे ‘ड्रम’कार्ड; जिल्हाभरात अनेक पेट्रोल पंप ‘ड्राय’, टाक्या फुल करून घेण्यासाठी चोहीकडे रांगा, पण पेट्रोल-डिझेल मिळेना; टंचाईचे सावट गडद

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर इंधन उपलब्ध नसल्याने ‘नो स्टॉक’चे बोर्ड झळकले असून, काही ठिकाणी मर्यादित प्रमाणात इंधन वितरण सुरू असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. अनेक तालुक्यांत पेट्रोल संपल्याने वाहनधारकांनी गाड्या घरीच ठेवून चक्क ड्रम, कॅन, बाटल्यांसह पंपांवर गर्दी केल्याचेही दिसत आहे.
विशेषतः राष्ट्रीय महामार्ग आणि मुख्य रस्त्यांलगत असलेल्या पेट्रोल पंपांवर मोठ्या मालवाहू वाहनांच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही मोठा परिणाम होत असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
काही बंद असलेल्या पेट्रोल पंपांच्या प्रवेशद्वारासमोर जेसीबी, मोटरसायकली तसेच अन्य वाहने आडवी उभी करून पंप बंद असल्याचे दर्शविण्यात येत आहे. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये संभ्रम व चिंतेचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान, खरीप हंगामाची तयारी सुरू असताना इंधन टंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी वर्गाला बसत आहे. शेती मशागतीची कामे वेगात सुरू असताना ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना एका पेट्रोल पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करावी लागत आहे. अनेक शेतकरी कॅनमध्ये डिझेल भरून नेत असल्याचे दृश्य शहर व ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर पाहायला मिळत आहे.
इंधनाच्या कमतरतेमुळे शेतीची कामे, मालवाहतूक, सार्वजनिक वाहतूक आणि दैनंदिन व्यवहार विस्कळीत झाले आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून नियमित इंधन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिक व वाहनधारकांकडून केली जात आहे. गेली दोन-तीन दिवस पेट्रोल-डिझेलसाठी सगळीकडे रांगा लागल्यानंतर प्रशासनाकडून आज, बुधवारी दुपारनंतर इंधनपुरवठा सुरळित होणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, त्याआधी आज दुपारपर्यंत तरी पंपांवरील रांगा कमी झालेल्या नव्हत्या.



