मुख्य बातम्या

हटके बातमी : दाढीसह लग्न करण्‍यास मनाई, डीजेलाही बंदी, अफू-मद्य सेवन केल्‍यास थेट कार्यक्रमावर बहिष्‍कार अन्‌ अडीच लाखांचा दंड; ‘गुर्जर’ समाजाचा स्‍तुत्‍य निर्णय

जयपूर (वृत्तसंस्‍था / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : विवाह समारंभ, कुटुंबातील मृत्‍यूनंतर आयोजित केले जाणारे कार्यक्रम आणि इतर सामुदायिक सोहळ्‍यांमध्‍ये पाळल्‍या जाणार्‍या कुप्रथांच्‍या माध्‍यमातून केली जाणारी पैशांची उधळपट्टी थांबविण्‍यासाठी राजस्‍थानातील गुर्जर समाजाने अनेक स्‍तुत्‍य निर्णय घेतले आहेत. यात नियोजित वराला दाढीसह लग्न करण्‍यास मनाई, डीजे लावण्‍यास बंदी तसेच कार्यक्रमात डोडा, अफू आणि मद्याचे सेवन करण्‍यास पूर्णत: बंदी आदींचा समावेश आहे.
राजस्‍थानच्‍या पाली, जोधपूर, ब्‍यावर, जालोर व नागौर या पाच जिल्‍ह्यांत गुर्जर समाजाने हे कडक नियम लागू केले असून, या नियमांचे सगळीकडेच स्‍वागत होत आहे. पाली जिल्‍ह्यातील सोजत परिसरातील देवडुंगरी येथील देवनारायण मंदिरात गुर्जर महापंचायत पार पडली. यात हे महत्त्‍वाचे निर्णय घेण्‍यात आले. या महापंचायतीत सर्वाधिक चर्चेचा निर्णय ठरला तो म्‍हणजे नियोजित वराने क्‍लीन शेव्‍ह ठेवूनच बोहल्‍यावर चढावे. समाजातील कोणत्‍याही मुलाला यापुढे दाढी ठेवून बोहल्‍यावर चढता येणार नाही. तसे केल्‍यास हा सामाजिक नियमभंग मानला जाणार आहे. याशिवाय नियोजित वराच्‍या पोशाखासाठी २१ हजार रुपयांची मर्यादा घालण्‍यात आली आहे. एवढेच नाही तर सोहळे व कार्यक्रमांमध्‍ये डोडा, अफू किंवा मद्याच्‍या सेवनावर पूर्णत: बंदी घालण्‍यात आली आहे.
बाराव्‍याला साधं जेवण अन्‌ लापशी
गुर्जर महापंचायतीने बालविवाह आणि अंत्‍यसंस्‍कारानंतरच्‍या जेवणांवरही मोठ्या मर्यादा आणल्‍या आहेत. यानुसार आता एखाद्याच्‍या मृत्‍यूनंतर बाराव्‍या दिवशी घातले जाणारे जेवण फक्‍त साधे राहणार असून, जेवणात गोडपदार्थ म्‍हणून फक्‍त लापशी केली जाईल. गरजू कुटुंबांना शिक्षण, रोजगार आणि आर्थिक आधार देण्‍यासाठी समाजाने पैशांची उधळपट्टी रोखणे गरजेचे असल्‍यावर महापंचायतीच्‍या या बैठकीत भर देण्‍यात आला.
अडीच लाखांचा दंड, बहिष्‍कारही घालणार
गुर्जर महापंचायतीने घेतलेले निर्णय संपूर्ण समाजासाठी बंधनकारक राहणार आहेत. या नियमांचे उल्‍लंघन करणे हे सामाजिक नियमभंग मानला जाणार असून, तसे केल्‍यास संबंधितांना २.५ लाख रुपये दंड ठोठावला जाईल. लग्न सोहळे व कार्यक्रमांत नियमांचे पालन केले जात नसल्‍याचे आढळल्‍यास समाजातील सदस्‍य त्‍या ठिकाणी जेवणार नाहीत तसेच त्‍या कार्यक्रमावर बहिष्‍कार टाकतील, असा निर्णयही महापंचायतीने घेतला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button