शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या भावांमध्ये राडा; मोठ्याचा चौघांच्या मदतीने लहान्यासह आई-वडिलांवर हल्लाबोल; चार जखमी, शहाद्यातील कोळपांढरी शहाणातील धक्कादायक घटना

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : सामायिक शेतीच्या हिस्से वाटणीवरून एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या भावांमध्ये तुफान राडा झाल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील कोळपांढरी, पोस्ट शहाणा येथे घडली. यात मोठ्या भावाने लहान भावासह आई-वडिल आणि भांडण मिटवायला आलेला नातेवाईक अशा चौघांना इतर चार जणांच्या मदतीने मारहाण केली. यात हे चौघेही जखमी झाले असून, या प्रकरणी मोठ्या भावासह त्याच्या चार साथीदारांवर शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुरसिंग मलजी पावरा (६०, रा. कोळपांढरी, पो. शहाणा, ता. शहादा) यांनी कोळपांढरी शिवारात शेती असून, या शेतीच्या हिस्से वाटणीवरून सुरेश (३५) व भिवा (३७) या त्यांच्या दोन्ही मुलांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. याच दरम्यान रविवारी (दि. १७) दुपारी तीन वाजेच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा याच मुद्द्यावरून वादावादी झाली. काही मिनिटांतच या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले.
यावेळी भिवा पावरा याने मागचापुढचा विचार न करता यावेळी त्याच्या मदतीसाठी तेथे उपस्थित असलेल्या साथीदारांच्या मदतीने लहान भाऊ सुरेश याच्यावर लाकडी दांडा असलेल्या फावड्याने हल्लाबोल केला. यात सुरेश याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला घाव बसला आणि तो गंभीर जखमी झाला. त्याचवेळी त्यांची आई बायसीबाई आणि वडिल धुरसिंग तसेच आणखी एक नातेवाईक मनोज पावरा हे तिघे हे भांडण सोडविण्यासाठी मध्ये पडले. यावेळी भिवा व त्याच्या साथीदारांनी या तिघांनाही लाथाबुक्क्यांसह लाकडी डेंगार्याने मारहाण केली. यात धुरसिंग व बायसीबाई हे दोघे गंभीर जखमी झाले. तर मनोज पावरा याला किरकोळ दुखापत झाली. सुरेश, धुरसिंग व बायसीबाई या तिघांवर सध्या उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या प्रकरणी सुरेश धुरसिंग पावरा याने १८ मे रोजी शहादा पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यावरून भिवा धुरसिंग पावरा याच्यासह वसंत किरण पावरा (२२), राकेश मुन्ना पावरा (२५), गणेश मुन्ना पावरा (२१) आणि त्याचे सख्खे काका किरण मलजी पावरा (५८) अशा एकूण पाच जणांवर गुन्ह दाखल करण्यात आला. सध्या पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मोहन सावळे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.



