महाराष्ट्र

रुग्‍णांसाठीच्‍या गोळ्‍या-औषधी खरेदी करून ठेवली का?; उद्या औषधी विक्रेते संपावर; नंदुरबार जिल्‍ह्यातील खासगी ‘मेडिकल’ राहणार बंद!

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आपल्‍या विविध प्रलंबित मागण्‍या पूर्ण व्‍हाव्‍यात यासाठी अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने उद्या (बुधवार दि. २०) बंद पुकारला असून, या बंदमध्‍ये नंदुरबार जिल्‍ह्यातील सर्व खासगी औषधी विक्रेते (मेडिकल दुकानदार) सहभागी होणार आहेत. यामुळे उद्या जिल्‍ह्यातील औषधी विक्रीची दुकाने बंद राहणार आहेत.
औषधी विक्रेता संघटनेने यापूर्वीच बंदचा इशारा दिला होता. त्‍यामुळे उद्या, बुधवारी जिल्‍हाभरातील मेडिकल दुकाने बंद राहणार हे निश्‍चित मानले जात आहे. तर प्रशासनाने या बंदला सामोरे जातानाच जिल्‍हाभरातील रुग्‍णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने तयारी करून ठेवली आहे. बंदकाळात रुग्‍णांची गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्‍हा रुग्‍णालयांतील औषध साठा अद्ययावत ठेवतानाच काही निवडक दुकाने तसेच आपत्‍कालीन सेवा सुरू राहणार आहे. याशिवाय जिल्‍हाभरात कायदा व सुव्‍यवस्‍था अबाधित राखण्‍यासाठी अन्न व औषधी प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाने आवश्‍यक उपाययोजना हाती घेतल्‍या आहेत.
दुसरीकडे, जिल्‍हाभरात रुग्‍ण व त्‍यांच्‍या आप्‍तस्‍वकियांनी रुग्‍णांसाठी आवश्‍यक आणि नित्‍यनियमाची औषधी तसेच वैद्यकीय साहित्‍य उद्याच्‍या बंदच्‍या पार्श्वभूमीवर आधीच खरेदी करून ठेवावीत, असे आवाहन अन्न व औषधी प्रशासनाचे सहायक आयुक्‍त (औषधी) सु. सा. देशमुख यांनी केले आहे.
बंद अवैध, कारवाईचा इशारा
अन्न व औषधी प्रशासनाने औषध विक्रेत्‍यांचा बुधवारचा बंद अवैध असल्‍याचे म्‍हटले आहे. औषधी या ‘अत्‍यावश्‍यक वस्‍तू कायदा १९५५’ अंतर्गत मोडत असून, रुग्‍णांना औषधी न पुरवणे किंवा विक्री न करणे हे कायद्याचे उल्‍लंघन ठरते. तसेच औषध किंमत नियंत्रण आदेश २०१३ आणि औषधी व सौंदर्य प्रसाधने कायदा, १९४० अंतर्गत मंजूर परवान्‍यांचा मुख्‍य उद्देश रुग्‍णांना वेळेवर औषधी मिळवून देणे हा आहे. अशा वेळी संपाच्‍या माध्‍यमातून रुग्‍णांना वेठीस धरणे आणि आपत्‍कालीन परिस्‍थिती निर्माण करणे हे कायद्याचे उल्‍लंघन आहे. यामुळे संपकाळात रुग्‍णांना औषधीअभावी त्रास झाला किंवा कायदा व सुव्‍यवस्‍थेची परिस्‍थिती निर्माण झाल्‍यास त्‍याची संपूर्ण जबाबदारी औषधी विक्रेत्‍यांची राहणार आहे. तसेच असे झाल्‍यास त्‍यांच्‍यावर कडक कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा अन्न व औषधी प्रशासनाने दिला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button