महाराष्ट्र

नंदुरबारच्‍या प्रवाशांना लुटणार्‍या खासगी ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍यांना ‘आरटीओ’चा दणका; एसटीच्‍या दीडपटीपेक्षा जास्‍त तिकीट दर न आकारण्‍याचा भरला दम; एसटी भाड्याचा तक्‍ता लावण्‍याचेही आदेश

नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : शाळा-महाविद्यालयांच्‍या सुट्या आणि सणासुदीच्‍या दिवसांत मनमानी पद्धतीने तिकीट दरवाढ करून प्रवाशांना लुटणार्‍या खासगी ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍यांना नंदुरबारच्‍या उपप्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) जोरदार दणका दिला आहे. जिल्‍ह्यातून पुणे व मुंबई मागांवर धावणार्‍या ट्रॅव्‍हल्‍स गाड्यांची अचानक तपासणी सुरू केली असून, यात एकान लक्‍झरी बस कंपनीला रस्‍ते वाहतूक कर न भरल्‍याने दंडही ठोठावण्‍यात आला.
नंदुरबार जिल्‍ह्यातून पुणे व मुंबई मार्गावर धावणार्‍या ट्रॅव्‍हल्‍स बसेसकडून मोठी तिकीट दरवाढ करण्‍यात आली होती. विशेषत: गेल्‍या १५ दिवसांत या बसेस कंपन्‍यांकडून प्रति प्रवासी दोन हजार ते २२०० रुपये तिकीट आकारले जात होते. प्रसार माध्‍यमांनी याबाबत आवाज उठवल्‍यानंतर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने त्‍याची दखल घेत या ट्रॅव्‍हल्‍स गाड्यांची अचानक तपासणी हाती घेतली होती.
आरटीओ कार्यालयाच्‍या चार वायूवेग पथकांनी अचानक सुरू केलेल्‍या या तपासणी मोहिमेमुळे खासगी ट्रॅव्‍हल्‍स कंपन्‍यांचे धाबे दणाणले आहे. विशेष म्‍हणजे या पथकांच्‍या या तपासणीत शनिवारी रात्री मुंबईकडे जाणार्‍या एका कंपनीच्‍या बसचा रस्‍ते वाहतूक कर अदा केला नसल्‍याची बाब समोर आली. यामुळे या बसचालकाला जागेवरच ५०० रुपयांचा दंड ठोठावण्‍यात आला.
दरम्‍यान, जिल्‍ह्यातील लक्‍झरी बसगाड्यांच्‍या मालकांनी आपल्‍या गाड्यांचे तिकीट दर महाराष्‍ट्र राज्‍य परिवहन मंडळाच्‍या (एस.टी.) तिकीटांच्‍या तुलनेत दीडपटींपेक्षा ठेवू नयेत, असे स्‍पष्‍ट आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी दिले आहेत. एवढेच नाही तर मुंबई, पुणे तसेच अहमदाबादसाठी सुटणार्‍या बसगाड्यांच्‍या तिकीट दराचा तक्‍ता आणि त्‍याशेजारीच याच मार्गावरील एस.टी.च्‍या तिकीट दराचा तक्‍ता येत्‍या दोन दिवसांत आपल्‍या कार्यालयात दर्शनी भागात लावावा, असे आदेशही लक्‍झरी गाड्यांच्‍या कंपन्‍यांच्‍या प्रमुखांना आरटीओने दिले आहेत. येत्‍या दोन दिवसांत असे तक्‍ते न लावल्‍यास कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्‍यात आला आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button