चारच दिवसांत दुसरा झटका: पेट्रोल, डिझेल पुन्हा महागले; आधी दरवाढीला चार वर्षांचा गॅप, आता मात्र चौथ्याच दिवशी दुसर्यांदा दरवाढ

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तब्बल चार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर झालेल्या इंधन दरवाढीला चार दिवस उलटत नाही तोच आता सरकारने सर्वसामान्यांना पुन्हा झटका दिला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज (मंगळवार, दि. १९) दुसर्यांदा दरवाढ करण्यात आली आहे.
आखाती युद्धामुळे निर्माण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. यानंतर देशभर काटकसरीच्या उपाययोजना सुरू झाल्या आहेत. या सार्यांतून सर्वसामान्य जनतेवर कोणत्याही क्षणी महागाईची कुर्हाड कोसळण्याची शक्यताही व्यक्त होत होती. ही भीती खरी ठरवताना इंधन पुरवठा करणार्या कंपन्यांनी १५ मे रोजी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली होती. १५ मे रोजी पेट्रोल प्रति लिटर ३ रुपये तर डिझेल ३ रुपये ११ पैशांनी महाग करण्यात आले होते.
यामुळे नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रति लिटरला ३ रुपयांच्या वाढीसह १०८ रुपये १३ पैसे तर डिझेलचा दर ३ रुपये ११ पैशांच्या वाढीसह ९४ रुपये ११ पैसे झाला होता. आता अवघ्या चार दिवसांच्या अंतराने या दरांमध्ये पुन्हा अनुक्रमे ८६ पैसे आणि ८३ पैशांची वाढ करण्यात आली आहे. यामुळे आता नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर १०८ रुपये ९९ पैसे झाला आहे. तर डिझेल आता ९४ रुपये ९४ पैसे प्रति लिटर या दराने मिळू शकणार आहे. आज मंगळवारी (दि. १५) सकाळी ६ वाजेपासून ही नवी दरवाढ लागू करण्यात आली आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकला असून, त्याच अनुषंगाने पहिले पाऊल टाकताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या चार दिवसांत दुसर्यांदा वाढ केली आहे.



