रोखठोक

रोखठोक बातमी : एकीकडे झटपट मदतीचे प्रात्‍यक्षिक, प्रत्‍यक्षात घटनास्‍थळी पोहोचण्‍यात उदासीनता…; शहाद्यातील ‘त्‍या’ घटनेने निघाले जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे ‘वाभाडे’!

शहादा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : विरचक धरणात पोहणार्‍या चारपैकी बुडणार्‍या एका मुलाचे प्राण अवघ्‍या एका कॉलवर वाचवण्‍याचे प्रात्‍यक्षिक दाखवणार्‍या जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेचे शहादा तालुक्‍यातील एका घटनेने मात्र पुरते वाभाडे काढले आहे. शहादा तालुक्‍यातील सुसरी प्रकल्‍पात युवक बुडाल्‍याची कल्‍पना देऊनही आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणा त्‍याचा मृतदेह काढण्‍यासाठी तब्‍बल २७ तास पोहोचली नसल्‍याचा आरोप केला गेला आहे. विशेष म्‍हणजे तब्‍बल २७ तासांनंतर हा मृतदेह स्‍वत:च पाण्‍यावर तरंगत येत जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे पितळ उघड पाडले.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संजय आनंद वळवी (रा. मलोनी, ह.मु. ब्राह्मणपुरी, ता. शहादा) हा तरुण मंगळवारी (दि. १९) मित्रांसमवेत सुसरी प्रकल्‍पात पोहण्‍यासाठी गेला होता. खोलीचा अंदाज न आल्‍याने तो पाण्‍यात बुडू लागला. संजय बुडत असल्‍याचे पाहून आसपासच्‍या लोकांनी आरडाओरड करीत त्‍याला वाचविण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यात कुणालाही यश आले नाही. दुपारी ३ वाजेच्‍या सुमारास घडलेल्‍या या घटनेची माहिती तत्‍काळ स्‍थानिक प्रशासनाला देऊन संजयचा मृतदेह पाण्‍याबाहेर काढण्‍यासाठी प्रयत्‍न करण्‍याची विनंती करण्‍यात आली. मात्र, प्रशासनाकडून या अनुषंगाने प्रयत्‍न करण्‍यात कोणतेही स्‍वारस्‍य दाखविण्‍यात आले नाही, असा आरोप केला जात आहे.
मच्‍छीमारांचे तोकडे प्रयत्‍न
प्रशासनाकडून वेळेत मदत न मिळाल्‍याने अखेर मच्‍छीमारांना संजयचा मृतदेह पाण्‍याबाहेर काढण्‍यासाठी विनंती करण्‍यात आली. मच्‍छीमारांनी अनेक तास जीव धोक्‍यात घालून संजयचा गायब असलेला मृतदेह शोधण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र, त्‍यात त्‍यांनाही यश आले नाही. महत्त्‍वाचे म्‍हणजे सगळे प्रयत्‍न थांबल्‍यानंतर बुधवारी सायंकाळी उशीरा संजयचा मृतदेह अचानक पाण्‍यावर तरंगताना दिसला. यानंतर कल्‍पना दिल्‍यावर स्‍थानिक प्रशासनाने हा मृतदेह ताब्‍यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
झटपट मदतीचे प्रात्‍यक्षिक
एकीकडे आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेच्‍या उदासीनतेमुळे संजय वळवी याचा मृतदेह सुसरी प्रकल्‍पात २७ तास पडून राहिल्‍याचे समोर आले असतानाच दुसरीकडे जिल्‍ह्यातील यंत्रणेने आपत्ती व्‍यवस्‍थापनाचे प्रात्‍यक्षिक करून दाखवले. याअंतर्गत विरचक धरणात एक मुलगा बुडत असल्‍याचा कॉल आल्‍यानंतर तातडीने १९ मे रोजी सायंकाळी पोलीस दलासह आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेच्‍या पथकांनी तेथे पोहोचून त्‍या मुलाला वाचविले, असे हे प्रात्‍यक्षिक होते. या माध्‍यमातून जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणा कोणतीही घटना घडली तरी लोकांचे जीव वाचविण्‍यासाठी किती तत्‍पर आहे, हे दाखविण्‍याचा प्रयत्‍न या माध्‍यमातून जिल्‍हा प्रशासनाने केला. या प्रात्‍यक्षिकात (मॉक ड्रिल) जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण, जिल्‍हा पोलीसदल, सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, आरोग्‍य, अग्निशमन दल अशा विभागाच्‍या अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहभाग घेतला होता.
एकीकडे जिल्‍ह्याची प्रशासकीय यंत्रणा आपत्ती घडल्‍यास जिल्‍हावासीयांच्‍या मदतीसाठी तत्‍पर असल्‍याचे प्रात्‍यक्षिकाच्‍या माध्‍यमातून दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला. त्‍याचवेळी दुसरीकडे शहादा तालुक्‍यातील सुसरी प्रकल्‍पात तरुणाचा मृतदेह शोधण्‍यात दाखवलेल्‍या उदासीनतेने जिल्‍हा आपत्ती व्‍यवस्‍थापन यंत्रणेचे वाभाडे निघत होते. असा विरोधाभास जिल्‍हावासीयांना पाहायला मिळाला, अशी चर्चा सुरू आहे. शिवाय, प्रशासनाच्‍या या उदासिनेबद्दल संजय वळवी यांच्‍या नातेवाईकांकडून तसेच या परिसरात संताप व्‍यक्‍त होत आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button