शहाद्यातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेने नगर पालिकेला घेरले; निवेदन देवून म्हणाले, अंत पाहू नका, तत्काळ रस्त्यांची दुरूस्ती करा, अन्यथा महागात पडेल!

शहादा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : जिल्ह्यातील महत्त्वाचे तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहादा शहरातील रस्त्यांची अवस्था बिकट झाल्याचा आरोप करीत शिवसेनेच्या शिंदे गटाने नगर पालिका प्रशासनाला कडक शब्दांत फैलावर घेतले आहे. शहरातील खड्डे बुजवून रस्त्यांची तत्काळ दुरूस्ती न केली गेल्यास प्रखर आंदोलन करावे लागेल, असा इशाराच शिवसेनेने नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.
शहादा शहरातील खड्ड्यांच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख मनलेश जैस्वाल यांच्या स्वाक्षरीने आज गुरुवारी (दि. २१) नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांना निवेदन सादर करण्यात आले. शहादा हे तालुक्याचे ठिकाण असून, तालुकाभरातून सुमारे २०० गावांतून शेकडो नागरिक दररोज विविध कामांनिमित्त शहादा शहरात येतात. मात्र, शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे त्यांना जीव मुठीत घेऊन शहरात फिरावे लागते. तसेच येथील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले असून, रस्त्यांच्या दयनीय अवस्थेमुळे शहरात छोटे-मोठे अपघात नेहमीचेच झाले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.
शहरात रस्त्यांवरील नेहमी होणार्या अपघातांचा परिणाम थेट शहरातील बाजारपेठेवर होत असून, परिणामी शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्यांना त्याचा फटका सहन करावा लागत आहे. या सर्वांची जाणीव असूनही नगर परिषदेचे पदाधिकारी आणि प्रशासन या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
पावसाळा उंबरठ्यावर येवून ठेपला असून, पावसाला सुरूवात होण्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दुरूस्ती न झाल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल आणि यामुळे कायदा व सुव्यवस्थेत बाधा आल्यास त्याची जबाबदारी नगर परिषदेची असेल, असा इशाराही या निवेदनात शिवसेनेने दिला आहे.
या निवेदनावर तालुकाप्रमुख मनलेश जैस्वाल, गोपाल कोळी, हितेंद्र वर्मा, डॉ. राजेंद्र सिंदरकर, ॲड. लव लोहार, जयसिंग ठाकरे, अंकुश लोहार, महेश पवार जगदीश पाटील आदींच्या स्वाक्षर्या आहेत.



