गॅसचा काळाबाजार : नंदुरबार शहरानजीक तळोदा रोडवर अवैध गॅस रिफिलिंग सेंटर उद्ध्वस्त, पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून एकाला ठोकल्या बेड्या
नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस या इंधनांच्या टंचाईमुळे जनता हैराण असतानाच जनतेच्या असहायतेचा गैरफायदा घेत गॅसचा काळाबाजार करीत अवैध गॅस रिफिलिंग करून देणार्या सेंटरचा नंदुरबार उपनगर पोलीस आणि जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) पर्दाफाश केला आहे. व्यावसायिक गॅसचे दुसर्या सिलिंडरमध्ये अवैध रिफिलिंग करताना एकाच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून, शंकरमल बिरबलराम बिष्णोई (३३, रा. प्लॉट नं. ५, वृंदावन कॉलनी, नंदुरबार मुळ रा. भारुओ की ढाणी, मांडपुरा मोडकिया, टेपू, जोधानी, ता. व जि. फलोदी, राजस्थान) असे या भामट्याचे नाव असून, पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील तळोदा रोडवरील धमडाई गाव शिवारातील समाधी पार्क येथील मितवा बंगल्याशेजारील एका बंगल्याच्या कम्पाऊंडमध्ये एक व्यक्ती घरगुती गॅस सिलिंडरमधील गॅस अवैधरित्या दुसर्या गॅस सिलिंडरमध्ये भरून देत असल्याची माहिती पोलिसांना खबर्याकडून मिळाली होती. त्यानुसार एलसीबी व उपनगर पोलिसांनी मगळवारी (दि. १९) मध्यरात्री ११.५५ वाजता छापा मारून शंकरमल बिरबलराम बिष्णोई याला अवैध कृत्य करताना रंगेहाथ पकडले.
असा सुरू होता कारभार
शंकरमल बिष्णोई याने या बंगल्याच्या आवारातच अवैध गॅस रिफिलिंग सेंटर सुरू केले होते. तेथे तो १.७५ एचपी क्षमतेच्या मोटारला स्प्रे पंप व दोन नळ्या जोडून व दुसर्या बाजूला रबरी नळीने गॅस सिलिंडर जोडून त्याच्या साह्याने नोझलच्या मदतीने एका सिलिंडरमधील गॅस दुसर्या सिलिंडरमध्ये भरून देत असे. पोलिसांनी छापा मारल्यावर त्या ठिकाणी शंकरमल हे अवैध कृत्य करताना रंगेहात पडकला गेला. यावेळी त्याच्याकडून एचपी कंपनीचे चार व्यावसायिक गॅसचे सिलिंडर, इंडेन कंपनीचे तीन व्यावसायिक गॅसचे सिलिंडर, इंडेन कंपनीचे एक अर्धवट भरलेले घरगुती गॅसचे सिलिंडर, एक वजन काटा, एक मोटार, एक स्प्रे, दोन रबरी नळ्या, नोझल असे एकूण ७५ हजार रुपये किमतीचे साहित्य जप्त केले.
गॅस ज्वलनशील पदार्थ असूनही त्याचे अवैध रिफिलिंग करून काळाबाजार करून स्वत:सह इतरांचा जीव धोक्यात घालताना आढळल्याने शंकरमल बिष्णोई याच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या २८७, २८८, १२५ सह अत्यावश्यक वस्तू अधिनियमाच्या कलम ३ व ७ नुसार नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांच्या वतीने हवालदार जितेंद्र पाडवी यांनी फिर्याद दाखल केली. पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ पौलाद भिल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.
‘नंदुरबार पोस्ट’ने उठवला होता आवाज
युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण परिस्थितीत नंदुरबार शहर व जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा असल्याच्या वावड्या उठविण्यात येत होत्या. याचा गैरफायदा घेत काही लोकांकडून जिल्हाभर गॅस सिलिंडरचा काळाबाजार सुरू असल्याच्या बातम्या वेळोवेळी देऊन ‘नंदुरबार पोस्ट’ने या विरोधात याआधीच आवाज उठवला होता.



