मुख्य बातम्या

धक्‍कादायक बातमी : १३ महिलांवर वाघिणीचा हल्‍ला; ४ ठार, मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती; एकाच वेळी वाघाने चार बळी घेण्‍याची देशातील पहिलीच घटना

चंद्रपूर (विशेष प्रतिनिधी / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : नंदुरबार जिल्‍ह्यात बिबट्यांनी दहशत पसरवली असतानाच तिकडे चंद्रपूर जिल्‍ह्यात वाघिणीने हल्‍ला करून एकाच वेळी चार महिलांचा बळी घेतल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे. जंगलात तेंदुपत्ता तोडण्‍यासाठी गेलेल्‍या १३ महिलांवर या वाघिणीने हल्‍ला केला. सध्‍या मृतांचा आकडा चार सांगण्‍यात येत असला तरी या हल्‍ल्‍यातील गंभीर जखमी महिलांची संख्‍या जास्‍त असल्‍याने मृतांचा आकडा वाढण्‍याची भीती व्‍यक्‍त होत आहे. दरम्‍यान, वाघाच्‍या हल्‍ल्‍यात एकाच वेळी चार जणांचा मृत्‍यू होण्‍याची ही देशातील पहिलीच घटना असल्‍याचे सांगितले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्‍ह्याच्‍या सिंदेवाही तालुक्‍यातील गुंजेवाही जंगलात १३ महिला सोबत तेंदुपत्ता तोडण्‍यासाठी गेल्‍या होत्‍या. तेथे पोहोचल्‍यानंतर तेंदुपत्ता तोडण्‍याचे काम सुरू असतानाच त्‍या ठिकाणी वाघिण आली आणि काही कळण्‍याच्‍या आत तिने महिलांवर झडप मारली. अचानक झालेल्‍या प्रकाराने घाबरलेल्‍या महिलांनी वाघिणीपासून बचावासाठी सैरावैरा धावण्‍यास सुरूवात केली. मात्र, वाघिणीने चार महिलांचा फडशा पाडला. या चौघींचाही जागीच मृत्‍यू झाला. तर इतर काही महिला गंभीर जखमी झाल्‍या.
अन्‌ गावकर्‍यांना कळले…
या महिलांपैकी एक जण वाघिणीच्‍या तावडीतून वाचून गावात धावत आली. तिने गावकर्‍यांना घडलेली घटना सांगितली. यानंतर गावकर्‍यांनी जंगलातील घटनास्‍थळी धाव घेतली. गावकरी तेथे पोहोचल्‍यावर त्‍यांना चार महिलांचे लचके तोडलेले मृतदेह आढळले. दरम्‍यान, वनविभागाचे पथकही घटनास्‍थळी पोहोचले असून, परिस्‍थितीचा आढावा घेत आहे. तर जखमी महिलांना रुग्‍णालयात उपचारासाठी दाखल करण्‍यात आले असून, त्‍यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्‍याचे सांगण्‍यात येते.
दरम्‍यान, गेल्‍या वर्षी १० मे रोजी सिंदेवाही तालुक्‍यातीलच मेंढा (माल) नजीकच्‍या जंगलात वाघाने हल्‍ला करून तीन महिलांना ठार केले होते. त्‍यानंतर याच परिसरात झालेली ही दुसरी मोठी घटना आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button