नंदुरबार जिल्ह्यात काँग्रेसचा ‘दीप’ तेवत ठेवण्याची जबाबदारी शहाद्याच्या पटेलांवर; दीपक पटेल यांच्याकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : गेल्या साडेसहा वर्षांपासून भरकटत चाललेल्या नंदुरबार जिल्हा काँग्रेस पक्षाला अखेर दीपक पटेल यांच्या रूपाने नवा ‘कॅप्टन’ मिळाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून काम करणारे शहादा येथील दीपक रमणभाई पटेल यांची पक्षाचे नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.
सध्या शिवसेनेकडून विधान परिषद सदस्य असलेले आ. चंद्रकांत रघुवंशी यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देताना पक्षाला रामराम केला होता. तेव्हापासून आजतायगत गेल्या साडेसहा वर्षांत काँग्रेस पक्षाला जिल्हाध्यक्षपदी कुणाचीही नियुक्ती करता आली नव्हती. अखेर गेल्या महिन्यात पक्षाने देशभरात संघटन सृजन अभियान राबवून विविध जिल्ह्यांत जिल्हाध्यक्ष नियुक्ती करण्याच्या दृष्टीने पावले टाकली होती.
याच अनुषंगाने पक्षाचे निरीक्षक म्हणून अखिलेश शुक्ला यांनी नंदुरबार जिल्ह्याचा दौरा करून जिल्हाध्यक्ष नियुक्तीच्या दृष्टीने चाचपणी केली होती. जवळपास आठवडाभर शुक्ला यांनी नंदुरबारमध्ये मुक्काम ठोकताना जिल्हाभर दौरे करीत पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध घटकांशी चर्चा केली होती. तसेच जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या नेत्यांच्या मुलाखतीही घेतल्या होत्या. त्यावेळी तब्बल २४ जणांनी जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा शुक्ला यांच्याकडे प्रकट केली होती. या सर्वांच्या मुलाखतीनंतर शुक्ला यांनी आपला गोपनीय अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर केला होता.
हा अहवाल आणि त्यात करण्यात आलेल्या शिफारशीचा विचार करून काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अखेर जिल्हाध्यक्षपदाची माळ दीपक पटेल यांच्या गळ्यात घातली आहे. दीपक पटेल गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचे निष्ठावंत व सक्रीय कार्यकर्ते म्हणून काम करीत असून, त्यांनी शहादा नगर पालिकेचे उपाध्यक्ष म्हणूनही जबाबदारी सांभाळलेली आहे.



