मुख्य बातम्या

आर्थिक चटक्‍याची ‘हॅट्‍ट्रिक’ : ९ दिवसांत पेट्रोल, डिझेलच्‍या दरात तिसर्‍यांदा वाढ; आता पेट्रोल आणखी ८७ पैसे, तर डिझेल ९१ पैशांनी महागले

मुंबई (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्‍या युद्धाची झळ भारतीयांना बसू लागली असून, अवघ्‍या ९ दिवसांच्‍या कालावधीत देशात सलग तिसर्‍यांदा पेट्रोल-डिझेलच्‍या दरात वाढ झाली आहे. एकीकडे दिवसागणिक या इंधनांच्‍या दरात वाढ होतेय आणि दुसरीकडे पैसे मोजण्‍याची तयारी ठेवूनही हे इंधन उपलब्‍ध होत नाही, अशा दुहेरी कोंडीत सर्वसामान्‍य जनता अडकली आहे.
आखाती युद्धामुळे निर्माण परिस्‍थितीच्‍या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काटकसरीचे आवाहन केले होते. विशेषत: पंतप्रधानांनी इंधनाचा वापर कमीत कमी करावा, असे म्‍हटले होते. त्‍याचवेळी सामान्‍य जनतेला आर्थिक अरिष्‍ट्याला सामोरे जावे लागण्‍याचा अंदाज आला होता. आणि पाठोपाठ झालेही तसेच. तब्‍बल चार वर्षांच्‍या कालावधीनंतर इंधन कंपन्‍यांनी १५ मे रोजी पहिल्‍यांदा मोठी दरवाढ केली होती. त्‍यावेळी पेट्रोल प्रति लिटर ३ रुपये तर डिझेल ३ रुपये ११ पैशांनी महाग करण्‍यात आले होते.
यामुळे नंदुरबार जिल्‍ह्यात पेट्रोलचा दर प्रति लिटरला ३ रुपयांच्‍या वाढीसह १०८ रुपये १३ पैसे तर डिझेलचा दर ३ रुपये ११ पैशांच्‍या वाढीसह ९४ रुपये ११ पैसे झाला होता. त्‍यानंतर अवघ्‍या चार दिवसांच्‍या अंतराने पेट्रोल ८६ पैशांच्‍या वाढीसह १०८ रुपये ९९ पैसे तर डिझेल ८३ पैशांच्‍या वाढीसह ९४ रुपये ९४ पैसे प्रति लिटर या दरावर पोहोचले होते. आता आज शनिवारी (दि. २३) पेट्रोलच्‍या दरात ८७ पैसे तर डिझेलच्‍या दरात ९१ पैशांची प्रती लिटरला वाढ करण्‍यात आली आहे. आज सकाळी ६ वाजेपासून ही नवी दरवाढ लागू करण्‍यात आली आहे. नव्‍या दरवाढीमुळे नंदुरबार जिल्‍ह्यात आता पेट्रोल प्रति लिटर १०९ रुपये ८६ पैसे तर डिझेल प्रति लिटर ९५ रुपये ८५ पैसे या दराने मिळणार आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकला असून, त्‍याच अनुषंगाने पावले टाकताना सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्‍या ९ दिवसांत तिसर्‍यांदा वाढ केली आहे.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button