प्रकाशा ग्रामपंचायत प्रशासन आक्रमक; स्थानिकांच्या नाराजीनंतर अतिक्रमणधारकांना नोटिसा, रस्त्यावर उतरून कानउघाडणी करीत भरला दम

प्रकाशा (खास बातमीदार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : प्रकाशा येथील मुख्य बसस्थानक परिसरातील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यावर स्थानिकांकडून संताप व्यक्त होऊ लागल्यानंतर अखेर ही अतिक्रमणे हटवण्यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. संबंधित अतिक्रमणधारक दुकानदारांना ग्रामपंचायत प्रशासनाकडून नोटिसा बजावण्यात आल्या असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची अधिकाऱ्यांनी चांगलीच कानउघडणी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायतीने गट नं. ८८/१ मधील जागा स्थानिक बेरोजगार व व्यावसायिकांना ११ महिन्यांच्या भाडेकरारावर व्यवसायासाठी दिली होती. मात्र काही दुकानदारांनी मंजूर जागेच्या पुढे जाऊन थेट मुख्य रस्त्यावर दुकाने वाढवली, लोखंडी शेड उभारले तसेच पार्किंगची जागाही अडवली. काहींनी तर स्वतः दुकान न चालवता सरकारी जागा दुसऱ्यांना भाड्याने दिल्याचेही समोर आले आहे.
यामुळे बसस्थानक परिसरात वाहतूक कोंडी होत होती. तसेच अपघातांचा धोका वाढून स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बस व इतर वाहनांना वळण घेताना मोठी कसरत करावी लागत असून, पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांचा संताप उफाळला
या वाढत्या अतिक्रमणाविरोधात ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी आणि आदिवासी संघटक यांनी आक्रमक होत मोर्चा काढून संताप व्यक्त केला. बोगस अतिक्रमण हटवण्यासाठी प्रकाशातील लोक थेट रस्त्यावर उतरले. स्थानिकांच्या या संतापाची अखेर ग्रामपंचायत प्रशासनाला दखल घ्यावी लागली. गांधी चौकापासून मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली.
मोर्चात सहभागी मान्यवर
या अतिक्रमण हटाव मोहिमेत नंदुरबार जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, ग्रामविकास अधिकारी बी. जी. पाटील, सरपंच राजनंदिनी भिल, माजी सरपंच अमृत ठाकरे, दिलीप ज्ञानदेव पाटील, रवींद्र भिल, प्रकाश ठाकरे, अंबालाल माळी, पिंट्या भिल, कैलास भिल यांच्यासह ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
प्रशासनाचा सज्जड दम
ग्रामपंचायत प्रशासन आणि अधिकाऱ्यांनी संयुक्त पाहणी करून नियमभंग करणाऱ्या दुकानदारांना स्पष्ट इशारा दिला. मुदतीत अतिक्रमण न हटवल्यास पोलीस बंदोबस्तात सर्व अनधिकृत बांधकामे, टपऱ्या, लाऱ्या, साईन बोर्ड, कुलर, फर्निचर जप्त करून दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.



