महाराष्ट्र

हाती ना शाळा सोडण्‍याचा दाखला ना गुणपत्रक, तरी अकरावीच्‍या ऑनलाईन प्रवेशासाठी कसरत; भर उन्हाळ्यातील प्रवेश प्रक्रियेच्या अट्टाहासाने विद्यार्थी-पालक हैराण

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्यात यंदा इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया अत्यंत घाईगडबडीत सुरू करण्यात आल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षण क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दहावीचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच नोंदणी प्रक्रिया सुरू करणे, निकालानंतर लगेच शून्य प्रवेश फेरी सुरू करणे, आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसताना प्रवेशासाठी दबाव निर्माण होणे हे सारे प्रचंड उन्‍हाळ्यात घडत असल्‍याने या संपूर्ण प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यात सध्या तीव्र उष्णतेची लाट सुरू असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४५ अंशांच्या पुढे गेले आहे. असे असताना विद्यार्थी आणि पालकांना मात्र ऐन उन्‍हात वारंवार महाविद्यालयांच्या फेऱ्या माराव्या लागत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा वेळापत्रक महत्त्वाचे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
दहावीच्‍या निकालाआधीच सुरू झाली प्रवेश प्रक्रिया
यंदा सर्वात मोठा गोंधळ म्हणजे दहावीचा निकाल लागण्यापूर्वीच ११वीची प्रवेश नोंदणी सुरू करण्यात आली. विद्यार्थ्यांना गुण किती येतील, कोणती शाखा निवडायची, कोणत्या महाविद्यालयात प्रवेश मिळण्याची शक्यता आहे, याची स्पष्टता नसताना नोंदणी प्रक्रिया सुरू झाली. निकालानंतर विद्यार्थ्यांना योग्य निर्णय घेण्यासाठी वेळ मिळण्याऐवजी त्यांच्यावर तातडीने प्रवेश प्रक्रियेचा ताण टाकण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. अनेक विद्यार्थ्यांना अजूनही मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला (एलसी) मिळालेला नाही. तरीही शून्य प्रवेश फेरी सुरू करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना हमीपत्र देऊन तात्पुरता प्रवेश घ्यावा लागत आहे. नंतर मूळ एलसी आणि गुणपत्रक मिळाल्यावर पुन्हा महाविद्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करावी लागतील. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकाला किमान तीनदा महाविद्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागणार आहेत.
पहिल्यांदा ऑनलाइन नोंदणी, त्यानंतर प्रत्यक्ष प्रवेश आणि नंतर मूळ कागदपत्रे जमा करण्यासाठी पुन्हा उपस्थिती, अशा या प्रक्रियेमुळे ग्रामीण भागातील पालकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिक दमछाक होत आहे. बसप्रवास, इंटरनेट सुविधा, सायबर कॅफे खर्च आणि दिवसभर उन्हात होणारी धावपळ यामुळे अनेक पालक त्रस्त झाले आहेत.
यंदाही ऑनलाइन प्रणालीत तांत्रिक अडचणी येत आहेत. वेबसाइट स्लो होणे, ओटीपी न मिळणे, कागदपत्र अपलोड त्रुटी, सर्व्हर डाऊन होणे अशा समस्यांमुळे विद्यार्थी आणि पालकांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे ऑनलाइन प्रक्रिया सुलभतेसाठी की त्रासासाठी?, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
यासोबतच आयटीआय आणि अभियांत्रिकी पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचाही विचार करण्यात आलेला नाही. अनेक विद्यार्थी अकरावी, आयटीआय आणि डिप्लोमा या तिन्ही पर्यायांचा विचार करतात. मात्र, सर्व प्रवेश प्रक्रिया एकाच काळात सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे.
सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांना यंदापासून दोन वेळा परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रेणी सुधार परीक्षेत अधिक गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी नेमकी कशी करावी, याबाबत स्पष्ट माहिती नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.
गेल्या वर्षापासून अकरावी प्रवेश प्रक्रियेत राखीव प्रवर्गासाठी एनसीएल (नॉन क्रिमी लेअर) प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. प्रत्यक्षात एनसीएलची सक्ती प्रामुख्याने व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी असताना अकरावीसाठी त्याचा अट्टाहास का केला जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तहसील कार्यालयांच्या फेऱ्या, कागदपत्रांची पडताळणी आणि विलंब यामुळे ग्रामीण भागातील पालकांची आणखी गैरसोय होत आहे.
मुळात ११वी प्रवेश प्रक्रिया मे महिन्याच्या शेवटी किंवा सर्व विद्यार्थ्यांना कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरू करणे अधिक योग्य ठरले असते. विद्यार्थ्यांना निकाल समजून घेणे, शाखा निवड आणि पालकांशी चर्चेसाठी काही दिवसांचा अवधी देणे आवश्यक होते. प्रत्‍यक्षात तसे घडले नाही. शिवाय केवळ वेळापत्रक पूर्ण करण्याच्या घाईत विद्यार्थ्यांचे आरोग्य, मानसिक स्थिती, ग्रामीण वास्तव आणि पालकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष होणे अत्यंत गंभीर बाब आहे. या वाढत्या नाराजीची तातडीने दखल घेऊन प्रवेश प्रक्रियेत आवश्यक बदल करावेत, अशी मागणी होत आहे.


मूळ कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या हाती नसताना शासनाने हा घाट कशासाठी घातला, हेच कळत नाही. कागदपत्रे हातात आल्यानंतर प्रवेश प्रक्रिया राबवली तरीही प्रवेश प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून ऑनलाईन माध्यम जागृत ठेवणे आणि त्याचा फायदा प्रवेश प्रक्रिया करणार्‍या संबंधित कंपनीला व्‍हावा, यासाठी हे सारे सुरू आहे. प्रत्यक्षात या सार्‍यात शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांची ससेहोलपट होत आहे. सर्वांनी संघटित होऊन या प्रवेश प्रक्रियेला विरोधच केला पाहिजे, अशी माझी ठाम भूमिका आहे.
– प्रा .गणेश नारायण सोनवणे
(जिल्हाध्यक्ष, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटना, नंदुरबार)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button