तळोद्यात भरवस्तीत सुरू होता अफूचा बाजार; स्थानिक पोलिसांना पत्ताच नाही; एलसीबीने छापा टाकून केला तब्बल ९ किलोंचा मुद्देमाल जप्त; दुकानदाराला बेड्या

तळोदा (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : तळोदा शहरात भरवस्तीत आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली अफूची फुले विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने (एलसीबी) स्थानिक पोलिसांच्या मदतीने शहरातील पोस्ट गल्ली परिसरात हस्ती बँकेजवळ भरवस्तीत असलेल्या एका दुकानावर छापा मारून तब्बल ८ किलो ८५० ग्रॅम वजनाचा अफूच्या फुलांचा चुरा जप्त केला. या घटनेमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळोदा येथील पोस्ट गल्लीत एका दुकानात आयुर्वेदिक औषधीच्या नावाखाली अफू नामक अंमली पदार्थाची विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना खबर्याकडून मिळाली होती. त्यांनी तातडीने ही माहिती पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या कानावर घालतानाच सहकार्यांना सापळा रचून संबंधित ठिकाणी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने तत्काळ संबंधित दुकानावर छापा मारला. कारवाईदरम्यान कोणतीही गडबड होऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांची मदत घेण्यात आली.
पोलिसांच्या पथकाने संबंधित दुकानाची झाडाझडती घेतल्यावर तेथे मोठ्या प्रमाणात अफूची फुले साठवलेली आढळून आली. पोलिसांनी सुमारे ५३ हजार १०० रुपये किमतीचा हा संपूर्ण माल तत्काळ जप्त करून दुकान सील केले. कारवाईदरम्यान परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कारवाईत तळोदाचे पोलीस निरीक्षक राजन मोरे, विशाल नागरे, महेंद्र नगराळे, दादाभाई मासुळ, चेतन साळवे, तसेच उपनिरीक्षक गुलाब पावरा, गौतम बोराळे, अजय पवार, राजू पवार, विजय विसावे आदी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. या प्रकरणी पोलीस नाईक चेतन कृष्णा साळवे यांच्या फिर्यादीवरून दुकानदार शब्बीर शाकिर बोहरी (रा. पोस्ट गल्ली, तळोदा) याच्या विरोधात गुन्हा तळोदा पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विक्री प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. सध्या या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
दरम्यान, तळोदा शहरात भरवस्तीत असलेल्या दुकानात दुकानदाराकडून खुलेआम अमली पदार्थांची विक्री सुरू असताना स्थानिक पोलिसांना त्याची माहिती नसावी आणि या दुकानदारावर थेट एलसीबीला कारवाई करावी लागावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे.



