शेतकर्यांनो अति घाई संकटात नेई : मान्सून वेळेआधीच येणार, पण शंभर मिलीमीटर पावसाशिवाय पेरणी नकोच; कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांचा सल्ला

नंदुरबार (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : अंगाची लाहीलाही करणार्या उन्हाचा चटका सहन करून वैतागलेल्या राज्यातील दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. यंदा नेऋत्य मोसमी वारे अत्यंत वेगाने पुढे सरकत असल्याने महाराष्ट्रात यंदा नेहमीच्या वेळेआधीच मान्सून दाखल होण्याचा अंदाज असून, त्याआधी २९ मेपर्यंत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसतील, असे सांगण्यात येत आहे. मात्र, सोबतच पेरणीच्या तयारीत असलेल्या बळीराजाला हवामान तज्ज्ञांनी पेरणीसाठी सबुरीचा सल्ला दिला आहे.
सध्या सर्वत्र मशागतीची कामे सुरू असून, विशेषत: यंदा अभूतपूर्व अशा उन्हाचा त्रास सहन कराव्या लागलेल्या बळीराजाचे डोळे मान्सूनकडे लागले आहेत. अशातच मान्सून वेळेआधीच दाखल होण्याच्या बातमीने शेतकर्यांच्या चेहर्यावर हसू उमटले आहे. मात्र, मान्सून लवकर येत असल्यामुळे उत्साहाचे वातावरण असले, तरी पेरणीबाबत शेतकऱ्यांनी घाई न करण्याचा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. कैलास डाखोरे यांनी राज्यभरातील शेतकर्यांना दिला आहे. शेतात किमान ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस पडत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची अजिबात घाई करू नये, असे डॉ. डाखोरे यांनी म्हटले आहे. अपुऱ्या पावसाच्या बळावर पेरणी केल्यास ती वाया जावू शकते आणि अशा शेतकर्यांना आर्थिक नुकसान होवून दुबार पेरणीच्या संकटाला सामोरे जावे लागू शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
जूनमध्ये सरीवर सरी
अवघ्या देशाचे डोळे लागलेल्या मान्सूनची वाटचाल यंदा अत्यंत वेगाने सुरू असून, आठवडाभरानंतर सुरू होणार्या जून महिन्यात राज्यात नेहमीच्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसेल, असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे. शिवाय मान्सूनपूर्व पावसामुळे राज्यातील तापमानात मोठी घट होईल, ज्यामुळे सर्वांनाच उष्णतेच्या लाटेपासून मोठा दिलासा मिळेल, असेही सांगण्यात आले आहे. मात्र, मान्सूनपूर्व पावसाच्या काळात राज्यातील काही भागांत जोरदार वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात शेतात काम किंवा प्रवास करताना स्वतःसह पाळीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी खबरदारी घ्यावी, असे आवाहनही कृषी विद्यापीठाच्या हवामान विभागानेणकेले आहे.



