इंधन दरवाढीचा ‘चौकार’ : ११ दिवसांत पेट्रोल, डिझेलच्या दरात चौथ्यांदा वाढ; पेट्रोल आता आणखी २.६१ रुपये, तर डिझेल २.७१ रुपयांनी महागले

मुंबई (नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : आखातात पेटलेल्या युद्धामुळे मोठा तोटा सहन करावा लागत असल्याने इंधन वितरक कंपन्या सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करीत असून, आज, सोमवारी (दि. २५) पेट्रोलच्या दरात लिटरमागे तब्बल २ रुपये ६१ पैसे तर डिझेलच्या दरात लिटरमागे २ रुपये ७१ पैशांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या ११ दिवसांत इंधन वितरक कंपन्यांनी पेट्रोल व डिझेलच्या दरात केलेली ही चौथी वाढ आहे. इंधन दरवाढीचा विचार करता गेल्या ११ दिवसांत पेट्रोल एकूण ७ रुपये ३४ पैसे तर डिझेल एकूण ७ रुपये ५६ पैशांनी महागले आहे.
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेल्या युद्धाची झळ भारतीयांना बसत असून, अवघ्या ११ दिवसांच्या कालावधीत देशात सलग चौथ्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिवसागणिक या इंधनांच्या दरात वाढ होत असताना दुसरीकडे पैसे मोजण्याची तयारी ठेवूनही हे इंधन उपलब्ध होत नाही, अशा दुहेरी कोंडीत सर्वसामान्य जनता अडकली आहे.
आखाती युद्धामुळे निर्माण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनासह सर्वच बाबतीत काटकसरीचे आवाहन केले होते. त्याचवेळी सामान्य जनतेच्या मनात नजीकच्या भविष्यात मोठे संकट उभे ठाकणार असल्याची पाल चुकचुकली होती. इंधन वितरक कंपन्यांनी गेल्या १११ दिवसांत टप्प्याटप्प्याने चारवेळी इंधनाची दरवाढ करून सामान्यांची ही शंका खरी करून दाखवली. तब्बल चार वर्षांच्या कालावधीनंतर सर्वात प्रथम १५ मे रोजी इंधन वितरक कंपन्यांनी पहिल्यांदा पेट्रोल प्रति लिटर ३ रुपये तर डिझेल ३ रुपये ११ पैशांनी महाग केले होते.
यामुळे त्यावेळी नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोलचा दर प्रति लिटरला ३ रुपयांच्या वाढीसह १०८ रुपये १३ पैसे तर डिझेलचा दर ३ रुपये ११ पैशांच्या वाढीसह ९४ रुपये ११ पैसे झाला होता. त्यानंतर अवघ्या चार दिवसांनी १९ मे रोजी पेट्रोलच्या दरात ८६ पैसे तर डिझेल ८३ पैशांची वाढ झाली होती. यानंतर शनिवारी (दि.२३) या दोन्ही इंधनांच्या दरात अनुक्रमे ८७ पैसे व ९१ पैशांची प्रती लिटरला वाढ करण्यात आली होती. या तिन्ही दरवाढींनंतरही इंधन वितरक कंपन्यांचा तोटा कमी न झाल्याने त्यांनी आज (दि. २५) रोजी पेट्रोलच्या दरात आणखी २ रुपये ६१ पैसे तर डिझेलच्या दरात २ रुपये ७१ पैशांची घसघशीत वाढ केली. ही नवी दरवाढ आज सकाळी ६ वाजेपासून लागू करण्यात आली आहे. नव्या दरवाढीमुळे नंदुरबार जिल्ह्यात आता पेट्रोल प्रति लिटर ११२ रुपये ४७ पैसे तर डिझेल प्रति लिटर ९८ रुपये ५६ पैसे या दराने मिळणार आहे.
इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कडाडले आहेत. त्यामुळे भारतीय पेट्रोलियम कंपन्यांना मोठा तोटा सहन करावा लागत होता. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका संपताच केंद्र सरकारने यापैकी काही भार सर्वसामान्यांवर टाकला असून, त्याच अनुषंगाने पावले टाकताना सरकारला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या ११ दिवसांत चौथ्यांदा वाढ करावी लागली आहे.



