महाराष्ट्र

काळरात्र : राज्‍यात रविवारी रात्री तीन भीषण अपघात; १७ जणांनी गमावला जीव, आंबेनळी व लळींग घाट अन्‌ जुन्नरनजीक झाले अपघात

मुंबई / नंदुरबार (नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : राज्‍यातील अपघातांचे सत्र थांबायचे नाव घेत नसून, वेगवेगळ्‍या विभागातील १७ जणांसाठी रविवारची (दि.२४) रात्र काळरात्र ठरली. तीन वेगवेगळ्‍या प्रदेशांत रविवारी रात्रीपासून सोमवारी (दि. २५) पहाटेपर्यंत झालेल्‍या तीन अपघातांत या १७ जणांना जीव गमवावा लागला. सातारा जिल्ह्यातील आंबेनळी घाट, मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्‍यानजीकचा लळींग घाट आणि अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर जुन्नर तालुक्‍यात हे तीन अपघात झाले. या अपघातांमध्ये २० ते २५ जण गंभीर जखमी झाल्‍याचे सांगण्‍यात येत आहे.
आंबेनळी घाटात स्कॉर्पिओ दरीत कोसळून ८ मित्रांचा मृत्यू
साताऱ्यातील महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावरील आंबेनळी घाटात रविवारी रात्री उशीरा अत्यंत थरकाप उडवणारी घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे स्कॉर्पिओ गाडी घाटातील तब्बल ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण दुर्घटनेत तब्बल ८ जणांचा मृत्यू झाला. अपघातामध्ये मृत झालेल्या आठ मित्रांचा ग्रूप २३ तारखेला दापोली हर्णे बीच येथे फिरायला गेला होता. दुसर्‍या दिवशी रविवारी (दि. २४) परतत असताना त्यांची गाडी आंबेनळी घाटात दाभिळ टोक या ठिकाणी दरीत कोसळली.
या अपघाताची माहिती मिळताच रविवारी रात्री १० वाजेपासून महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमने सर्च ऑपरेशन सुरु केले. स्थानिक पोलीस व प्रशासनाची पथकेही त्‍यांच्‍यासोबत होती. मात्र, अंधार आणि दरीची खोली यामुळे मदतकार्यात मोठे अडथळे येत होते. अखेर दोरीला स्‍ट्रेचर बांधून मृतदेह बाहेर काढण्‍याचे काम उशीरापर्यंत सुरू ठेवण्‍यात आले.
या अपघातात ठार झालेले सर्वजण साताऱ्याच्‍या कोरेगाव तालुक्यातील आसगाव येथील रहिवासी आहेत. महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५), नितीन किसन नायकोंडे (३५), अशी या सर्वांची नावे आहेत.
लळींग घाटात तिहेरी अपघात; ५ प्रवासी दगावले
मुंबई-आग्रा महामार्गावरील धुळ्‍याजवळील लळींग घाटात सोमवारी पहाटेच्या सुमारास एक रेतीचा डंपर आणि ट्रॅव्हल्स गाड्यांचा तिहेरी अपघात झाला. या वाहनांमध्ये जोरदार धडक झाल्‍याने झालेल्‍या या अपघातात ५ प्रवाशांचा जागीच मृत्यू, तर २० ते २५ जण जखमी झाले. यातील १० ते १२ जणांची प्रकृती गंभीर असल्‍याचे सांगण्‍यात येते. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
एसटी बसने दुचाकीला चिरडले; चौघांचा जागीच मृत्यू
अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर परिसरात तिसरा अपघात घडला. कल्याणकडून आळेफाटाच्या दिशेने जात असताना एका एसटी बसने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, एसटी बसखाली चिरडल्या गेल्याने दुचाकीवरील चारही जणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button