नंदुरबार जिल्हा

‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ प्रकल्प द्या अन्‌ नंदुरबारचा औद्योगिक विकास घडवा; प्रा. मकरंद पाटील यांची केंद्रीय अवजड उद्योग मंत्र्यांकडे आग्रही मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्‍ट वृत्तसेवा) : आदिवासी बहुल आणि आकांक्षित जिल्हा असलेल्या नंदुरबारच्या सर्वांगीण विकासासह स्थानिक युवकांच्या हाताला कायमचा रोजगार मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी ‘रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट’ (आरईपीएम) उत्पादन प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात स्थापन करावा, अशी आग्रही मागणी भारतीय जनता पक्षाचे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष प्रा. मकरंद नगीन पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात त्यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांना निवेदन दिले आहे. नंदुरबार जिल्हा भौगोलिकदृष्ट्या दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला मानला जातो. जिल्ह्यात मोठे उद्योगधंदे नसल्यामुळे येथील स्थानिक तरुण आणि मजुरांना पोटापाण्यासाठी व रोजगारासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये किंवा गुजरातेत स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर रोखायचे असेल तर जिल्ह्यात शाश्वत आणि अत्याधुनिक उद्योगांची निर्मिती अत्यंत गरजेचे आहे, याकडे प्रा. पाटील यांनी या निवेदनाच्‍या माध्‍यमातून कुमारस्‍वामी यांचे लक्ष वेधले आहे.
हे होतील फायदे…
केंद्र सरकारने हा अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प नंदुरबार जिल्ह्यात उभारल्‍यास जिल्ह्याचे चित्र पूर्णपणे बदलू शकते. या प्रकल दूरगामी फायदे होऊन स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण आणि तांत्रिक कौशल्य असलेल्या युवकांना स्वजिल्ह्यातच रोजगाराच्या चांगल्‍या संधी उपलब्ध होतील. रोजगारासाठी होणारे मजूर व तरुणांचे सक्तीचे स्थलांतर थांबू शकेल. ज्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल. या मोठ्या प्रकल्पामुळे जिल्ह्यात इतर पूरक उद्योगांचे जाळे निर्माण होईल आणि औद्योगिक क्षेत्राला नवी चालना मिळेल. जिल्ह्याच्या एकूणच आर्थिक उत्पन्नात वाढ होऊन नंदुरबार जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेला बळ देण्यासह नंदुरबार जिल्ह्याला देशाच्या औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरेल. केंद्र सरकारने या मागणीचा सकारात्मक विचार करून नंदुरबार जिल्‍ह्याच्‍या सर्वांगीण विकासासाठी हा ऐतिहासिक निर्णय घ्‍यावा, अशी अपेक्षा प्रा. मकरंद पाटील यांनी पत्रात नमूद केली आहे.
या मागणीमुळे नंदुरबारमधील बेरोजगार तरुणांच्या आशा पल्लवित झाल्या असून, केंद्र सरकार यावर काय निर्णय घेते याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

“रोजगार, विकास आणि आत्मनिर्भर नंदुरबार जिल्हा” हेच आपले मुख्य ध्येय आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या विकासासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू. आपण केलेल्‍या मागणीचा सकारात्‍मक विचार करून केंद्र सरकार या प्रकल्‍पाची भेट नंदुरबार जिल्‍ह्याला देईल, अशी आशा वाटते.
– प्रा. मकरंद पाटील
(नंदुरबार जिल्‍हा उपाध्‍यक्ष, भाजप)

Nandurbar Post Team

‘Nandurbar Post’ is the first and only authentic web news portal from Nandurbar, which covers every news of Nandurbar city and district.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button