कुकडेल परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करा : शहादाच्या उपनगराध्यक्ष माधवी पाटील यांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

शहादा (सलाउद्दीन लोहार / नंदुरबार पोस्ट वृत्तसेवा) : शहादा शहरातील कुकडेल परिसराचा झालेला चौफेर विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता स्थानिकांच्या सुरक्षेसह कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कुकडेल भागात तातडीने स्वतंत्र पोलीस चौकी कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणी शहादाच्या उपनगराध्यक्षा माधवी मकरंद पाटील यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
या संदर्भातील निवेदन त्यांनी नंदुरबारच्या पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्यासह शहादाचे पोलीस निरीक्षक यांना दिले आहे. सध्या शहादा नगरपालिकेचा मोठा विस्तार झाला असून शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहराला लागून असलेल्या कुकडेल परिसरात पूर्वीच्या वसाहतींसोबतच आता मोठ्या प्रमाणावर नवीन गृहप्रकल्प आणि वसाहती उभ्या राहिल्या आहेत. आजमितीस कुकडेल भागात शिवाजीनगर, श्रमिक कॉलनी, सिद्धार्थनगर, सालदारनगर, आझाद चौक, भवानी चौक, स्वीपर कॉलनी यांसह अनेक छोट्या-मोठ्या वसाहती असून, या भागात मध्यमवर्गीय व कामगार वर्गाची मोठी लोकवस्ती आहे. कुकडेल परिसरात एखादी अनुचित घटना घडल्यास किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास तेथील रहिवाशांना तातडीच्या मदतीसाठी शहादा-दोंडाईचा रस्त्यावर असलेले मुख्य पोलीस ठाणे गाठावे लागते. हे अंतर जास्त असल्याने लोकांना तेथे वेळेवर पोहोचणे कठीण जाते तसेच मुख्य पोलीस ठाण्यातून पोलिसांना घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येतात. वाढत्या लोकसंख्या पाहता या परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांची पेट्रोलिंग व चौकी असणे गरजेचे झाले आहे. स्थानिक रहिवाशांची मागणी लक्षात घेत कुकडेल परिसरासाठी स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करावी. यासाठी कुकडेल भागातील एमएसईबी कार्यालय परिसर किंवा आझाद चौकातील खुली जागा योग्य व मध्यवर्ती ठिकाणी आहे, असे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.



